यावल । तालुक्यातील किनगाव खुर्द येथे गेल्या वर्षभरापासून अपुर्णावस्थेत असलेल्या विवाह सभागृहाच्या छताचे काम सुरु होत आहे. मात्र, मुळ पाया बांधल्यावर वर्षभर त्यावर पाणी न मारल्याने ढासळत असलेल्या बांधकामवर टाकण्यात येणारा स्लब धोकेदायक ठरू शकतो म्हणुन संपुर्ण काम नव्याने करण्याची मागणी गटविकास अधिकार्यांकडे नागरिकांनी केली आहे. नव्याने काम न केल्यास उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे महेमुद पटेल यांनी दिला आहे.
छताचे बांधकाम कोसळण्याची भीती
तालुक्यातील किनगाव खुर्द येथे तब्बल 9 लाख 99 हजार 725 रूपये खर्च असलेल्या विवाह सभागृहाला मंजुरी देण्यात आली होती. ऑगस्ट 2015 मध्ये मंजुर झालेले सदरचे काम फेब्रुवारी 2016 मध्ये अपुर्ण अवस्थेत बंद पडले होते तेव्हा या भागातील नागरीकांनी बंद पडलेल्या या कामाची गुणवत्ता टिकून रहावी म्हणुन ग्रामपंचायतीकडे या बांधकामावर किमान पाणी मारावे अशी निवेदनाव्दारे मागणी केली होती मात्र, पंचायतीने याकडे दुर्लक्ष केले तेव्हा वर्षभर बंद पडलेल्या या कामाचे बांधकाम ढासळु लागले होते. यातच आता या ढासळत असलेल्या कामाची डागडूजी करीत येथे छताचे काम सुरू होत आहे. तेव्हा मुळ पायाच योग्य नसल्याने स्लॅब तग धरणार नाही आणि प्रसंगी बांधकामानंतर हे सभागृह कोेसळण्याची शक्यता आहे. काही दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्न निवेदनाव्दारे गटविकास अधिकारी वाय.पी. सपकाळे यांना विचारण्यात आला आहे तर नव्याने काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.