पिंपरी-चिंचवड : राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेने विवाह सोहळा आणि शालेय सहलींसाठी बनविलेल्या विशेष बसेसच्या पाहणीसाठी परिवहन मंत्री आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली. परंतु या बसेस पसंतीस न उतरल्याने ते अधिकार्यांवरच बरसले. ‘मी परिवहन विभागाचा प्रमुख आहे; त्यामुळे बसेस तयार करण्याआधी मला विचारायला हवे होते. विशेष गाड्या बनविल्या, मात्र त्यात त्रुटी आहेत. आता मी बदल सांगतो त्यानुसार गाड्या बनवा,’ असे त्यांनी अधिकार्यांना सुनावले.
पाहणीवेळी अधिकार्यांची उपस्थिती
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेने जुन्या बसेसचे नुतनीकरण करून विवाह समारंभासाठी आणि शाळेतील मुलांच्या सहलीसाठी विशेष बसेसची निर्मिती केली आहे. या बसेसची पाहणी करण्यासाठी दिवाकर रावते अधिकार्यांच्या आग्रहास्तव कार्यशाळेत आले होते. यावेळी खासदार रवी गायकवाड, मध्यवर्ती कार्यशाळेचे महाव्यवस्थापक आर. जी. कांबळे, कार्यशाळा यांत्रिकी महाव्यवस्थापक व्ही. बी. गायधने, ‘सीआरटी’चे संचालक डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, पिंपरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी उपस्थित होते.
बसचा रंग उडतो कसा?
दिवाकर रावते यांनी विशेष बसेसची काही वेळ पाहणी केली. मात्र, या बस त्यांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. सहलीच्या बसमध्ये मुलांचे साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा ठेवलेली नाही. तसेच, विवाह सोहळ्याच्या बसमध्ये दोन रांगामधील अंतरही अपुरे आहे, अशा त्रुटी काढत त्यांनी अधिकार्यांना खडे बोल सुनावले. बसेसच्या बांधणीमध्ये अनेक बदल होण्याची गरज आहे. खासगी बसच्या गाड्यांचा रंग उडत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा रंग उडण्याचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी अधिकार्यांना केला.
अधिकार्यांना विविध सूचना
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दरवाजांबाबत एका बसचालकाने दिलेल्या पत्राचा दाखला देत दिवाकर रावते म्हणाले की, बसचे दरवाजे आतील बाजूस उघडले पाहिजेत; जेणेकरुन वेळ वाचू शकतो. त्यामुळे यापुढे बसची बांधणी करताना वाहक, चालक आणि प्रवाशांच्या सूचनांचा जरूर अवलंब करावा. शिवाय इतर बसेसची देखभाल व दुरुस्तीदेखील योग्य प्रकारे झाली पाहिजे, अशा सूचनादेखील रावेत यांनी कार्यशाळेच्या अधिकार्यांना केल्या.