विवाह सोहळ्यात केला नेत्रदानाचा संकल्प

0

भुसावळ : विवाह सोहळा म्हटला की, लग्नाची सर्व धामधूम व उत्साहाचे वातावरण असते. मात्र या उत्साहाच्या वातावरणात अंध व्यक्तिंच्या जीवनातही आनंद निर्माण करता यावा, यादृष्टीने येथील रंगभवनात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात वधू-वरांसह नऊ जणांनी नेत्रदानाचा संकल्प करुन समाजात नेत्रदानाविषयी जागृतीचा संदेश दिला. येथील रेल्वेच्या रंगभवनात आशिष पवार व तनुजा या नवदाम्पत्याचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधू-वरांसह त्यांच्या परिवारातील सदस्य व वर्‍हाड्यांनी अंध व्यक्तिंच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेवून नेत्रदानाचा संकल्प केला.

विवाह सोहळ्यात वधू-वरांसह सुधाकर पवार, सुनिता पवार, अविनाश पवार, निलेश तायडे, कविता तायडे, वैशाली पगारे, क्षितिजा भोसले यांनी नेत्रदान संकल्पाचे अर्ज भरुन दिले. आई फाऊंडेशन व जळगाव येथील मांगिलालजी बाफना नेत्रपेढीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी अभय आखाडे, प्रितम टाक, विशाल खेडकर, ईश्‍वर बाविस्कर, संदिप निकम, मोहन तल्लारे, बी.एस. रामटेके यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेविका सविता मकासरे, दिनेश जोगदंड आदी उपस्थित होते.