पुणे । ‘स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे.’ ह्या भूमिकेतून राजा धनराजगिरजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पी.एम. शहा फाउंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता शपथ, चित्रकला स्पर्धा, परिसर प्रभातफेरी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती करण्यात आली.
पंतप्रधान स्वच्छता मोहिमेअंतर्गत ‘स्वच्छ भारत’ साध्य करण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबर कालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमाचे आयोजन राज्यातही करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शन केल्यानुसार महाविद्यालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वच्छता प्रभातफेरीची सुरुवात बुधवारी (दि.13) मुख्याध्यापक किशोर ओमासे यांनी फ्लॅग दाखवून केली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक घोषवाक्य लिहिलेले फलक घेऊन परिसरात प्रभातफेरी काढली. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पी.एम. शहा फाउंडेशनच्यावतीने श्री. फडतरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक किशोर ओमासे व सर्व शिक्षक उपस्थित होते.