पुणे । पुणे रेल्वे मंडळामार्फत 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. मंडळाच्या अखत्यारीतील रेल्वे स्थानक, रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरात स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, बारामती, उरुळी, लोणी, जेजूरी, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी तसेच तळेगाव इत्यादी रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात प्रवासी संघटना, सामाजिक संस्था तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पथनाट्य, पोस्टर, बॅनर, चर्चासत्र, घोषणा आणि स्वच्छतेबाबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
रेल्वे गाड्यांना वरिष्ठ अधिकार्यांनी भेट देऊन स्वच्छता, खाण्या-पिण्याच्या वस्तूंची पाहणी केली. प्रवाशांकडून रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेबाबत सूचना मागविण्यात आल्या. प्रवाशांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रवाशांनी केलेल्या सूचनांवर रेल्वे मंडळाकडून त्वरित कारवाई देखील करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता पसरविणार्या हजारपेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली.