विविध कंपन्यांच्या माध्यमातून पालिकेचा कौशल्य विकास उपक्रम

0

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचा उपक्रम महापालिका राबविणार आहे. पिंपरीतील महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाजवळील इमारतीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.

महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर
महापालिकेच्या नागरवस्ती विभागाअंतर्गत महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. त्यातून महिलांना स्वयंपूर्ण करणे हा उद्देश असतो. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसायात किंवा उद्योगात रूपांतर होण्याचे प्रमाण कमी आहे. म्हणून महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने स्कील डेव्हलमेंट (कौशल्य विकास कार्यक्रम) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात महापालिकेत बैठक झाली. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे, तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमात टाटा स्टेरो, एसकेएफ, उबेर, केटीएमटी, आयसीआय अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कंपनी असो किंवा विविध व्यवसाय यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी कौशल्य विकास होणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्याप्रमाणावर कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या सीएसआर फंडाची मदत मिळणार आहे. सुसंवाद साधण्यासाठी बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, कौशल्यविकासाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे महिला या केवळ एखादा अभ्यासक्रम पूर्ण करतात. आणि पुढे त्याचे व्यवसाय किंवा उद्योगात रूपांतर होत नाही. म्हणून योजना अधिक प्रभावीपणे राबविणे आणि संबंधित अभ्यासक्रमांचे कौशल्य प्राप्त व्हावे, या दृष्टीने पिंपरीत सावित्रीबाई फुले स्कील डेव्हलेपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहेत.
-एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेता