विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

0

राष्ट्रवादीच्या नगरसेवका सुलक्षणा शिलवंत यांच्या मागणीची दखल

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना, अपंग व्यक्तींच्या विकासाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नऊ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

19 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता या योजनांचा लाभ घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील संबंधित घटकातील अर्जदारांकडून 19 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, अर्ज करण्यासाठी कालावधी कमी होता. त्यामुळे या योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित राहू शकले असते. यासाठी नगरसेविका शिलवंत यांनी या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

44 नागरी सुविधा केंद्र
महापालिकेच्या 44 नागरी सुविधा केंद्रामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिलेल्या मुदतीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत अर्ज उपलब्ध होतील. अर्जात नमूद केलेल्या अटी-शर्तीनुसार आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले अपात्र तसेच मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज स्वीकारताना नागरी सुविधा केंद्रामार्फत प्रत्येक अर्जाकरिता वीस रुपये फक्त शुल्क आकारण्यात येईल. अर्थसहाय्याच्या योजनेंतर्गत लाभाकरिता संबंधित लाभार्थीच्या नावे बँकेमध्ये खाते असलेबाबत पास बुक, खाते क्रमांक आणि बँकेकडील पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.