चाळीसगाव । शहराच्याच नव्हे तर निम्म्या चाळीसगाव तालुक्याला वरदान ठरणार्या मात्र कालांतराने आज गटारगंगा झालेल्या तितुर – डोंगरी नदीच्या पुनर्जीवनाचा व संवर्धनाचा संकल्प आमदार उन्मेषदादा पाटील व सहकार्यांनी प्रशासनाच्या सहकार्याने केला आहे या उपक्रमाची सुरुवात मोरदरा धरण, जुनपाणी ता.चाळीसगाव येथून आज 11 जून 2017 रोजी रविवारी सकाळी 8 वाजता केली जाणार आहे.
तितुर नदीचा माथा (जुनपाणी), ओढरे, शिंदी, गणेशपूर, पिंप्री बु प्र.चा., चितेगाव, तांबोळे, पाटखडकी, चाळीसगाव शहर, ओझर, पातोंडा, बोरखेडा, वाघळी व तालुक्यातील पायथा असलेल्या हिंगोणे सिम इथपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंधारे, नदी खोलीकरण, डोह निर्मिती आदी कामांसाठी 14 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम 2 टप्यात केले जाणार आहे. लोकसहभागातुन जलसंवर्धनाकडे उपक्रमाची सुरुवात मोरदरा धरण, जुनपाणी येथून सुरूवात करून परिसराच्या गावातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. तितुर – डोंगरी नदीचे संवर्धन व तिला बारमाही प्रवाही करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या जलदिंडीत सहभाग घेण्याचे आवाहन आमदार उन्मेश पाटील यांनी केले .