विविध कार्यक्रमांनी देहूरोड, किवळे, देहू परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

0

दुचाकी रॅली, शिवज्योतींचे आयोजन : घोडे, उंट, ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका

देहूरोड । देहूरोड, किवळे आणि देहू परिसरात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशातील कलाकार तसेच घोडे, उंट आणि मर्दानी ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या मिरणुका सर्वच ठिकाणी लक्षवेधी ठरल्या. देहूरोड बाजारपेठेत शिवजयंती उत्सव समिती, शिवस्मारक समिती आणि शिवशंभो प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी येथील सुभाष चौकातील शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याला दिलीप शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी दत्तात्रय तरस, अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, बाळासाहेब फाले, विलास हिनुकले, धनंजय मोरे आदी उपस्थित होते.

महाराजांचा जिवंत देखावा
सायंकाळी बाजारपेठेतून शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नेत्रदिपक रोषणाईने मिरवणुकीचा रथ सजविण्यात आला होता. रथावर शनिवारवाड्यासमोर सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराज असा जिवंत देखावा तयार करण्यात आला होता. रथापुढे घोडेस्वार मावळे तसेच उंट चालत होते. त्यापुढे पुण्यातील नामवंत ढोलपथकाचे खेळ असा हा मिरवणूक सोहळा तब्बल चार तास रंगला. खासदार श्रीरंग बारणे यांच्याहस्ते भगवा ध्वज दाखवून मिरवणूक सुरू करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य ललित बालघरे, हाजीमलंग मारिमुत्तू, यदुनाथ डाखोरे, मिकी कोचर, लहूमामा शेलार, शिवाजी दाभोळे, महेश केदारी, अजय लांगे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांनी नेतृत्व केले. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्याहस्ते शिवजयंतीनिमित्त विविध प्रकारे योगदान देणार्‍या मंडळींचा सत्कार करण्यात आला.

तीन गावांमिळून एक शिवजयंती
विकासनगर-किवळे-आदर्शनगर या तीन गावांनी एकत्र येत यावर्षी प्रथमच एक गाव एक शिवजयंती संकल्पना राबविली. सकाळी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. दुपारी किवळे ते साईनगर अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी किवळे ते विकासनगर अशी सुमारे चार किलोमीटरची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री विकासनगर येथे शिवाजी महाराजांच्या आरतीने मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
यावर्षी पदाधिकारी कार्यकारिणी न निवडता, चाळीस जणांची एक समिती तयार करण्यात आली असून यातील कुणीही प्रसिध्दीसाठी आपल्या नावाचा वापर करू नये, अशी स्पष्ट ताकीद विकासनगर-किवळे-आदर्शनगर कार्यकर्त्यांना देण्यात आली होती. जय भवानी.. जय शिवाजी च्या घोषणांनी दिवसभर परिसर दणाणून गेला होता. देहुतही शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सन्मेश संजय पांडे या विद्यार्थ्याने देहुतील शिवाजी चौकात सुमारे 22 फुट लांब आणि 15 फुट रुंदीची शिवाजी महाराजांची रांगोळीतील चित्रकृती तयार केली होती. हि रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.