भुसावळ : वीज उत्पादनासोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य आदी क्षेत्रात भुसावळ वीज केंद्राने नावलौकिक प्राप्त केला असल्याने महानिर्मितीच्या विविध वीज केंद्रांसाठी आता भुसावळ वीज केंद्र हे ‘ट्रेंड सेटर’ बनले असल्याचे प्रतिपादन कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर यांनी केले. ते दीपनगरच्या दिपशक्ती क्रीडा संकुलात आयोजित बाह्य्गृह क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी भुसावळ आयुध निर्माणचे महाव्यवस्थापक रणजितसिंह ठाकूर, वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता माधव कोठुळे, नितीन गर्गे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, अधीक्षक अभियंते एम.पी.मसराम, राजेश राजगडकर, व्ही.एम. बारंगे, एम.बी. पेटकर, चंद्रकांत निमजे, पी.पी. देशकर, एन.आर. देशमुख, एम.बी. अहिरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते उपस्थित होते.
जॉगिंग ट्रॅकसह खुल्या जीमचे उद्घाटन
कैलाश चीरुटकर यांनी ध्वजारोहण करून क्रीडा स्पर्धेचे उदघाटन झाल्याची घोषणा केली. प्रारंभी भुसावळ वीज केंद्राच्या नामांकित खेळाडूंनी क्रीडाज्योत आणली त्यात ज्ञानेश्वर सहारे, राजेश शिंदे, संदीप वाघ, सुरेश वरणकर इत्यादींचा सहभाग होता. भुसावळ वीज केंद्रातील ज्येष्ठ खेळाडू नयनसागर मणी यांनी उपस्थित सर्व खेळाडूना शपथ दिली. याप्रसंगी महानिर्मितीच्या पारस, नाशिक, बांधकाम कोराडी येथील मुख्य अभियंता यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. क्रीडा स्पर्धा उद्घाटनापूर्वी लोकपयोगी 600 मीटर लांबीच्या नवनिर्मित जॉगिंग ‘जॉगिंग ट्रॅक’ व खुल्या जिमचे’ मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकातून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे यांनी बाह्य्गृह क्रीडा स्पर्धा आयोजनामागची महानिर्मितीची भूमिका विषद करताना सांगितले कि खेळाडूंनी स्पर्धेसोबतच महानिर्मितीच्या प्रगतीकरिता सर्वतोपरी प्रयत्न करावा. भुसावळ वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे म्हणाले कि, आवश्यक विविध सोयी सुविधा दीपनगर वसाहतीतच उपलब्ध झाल्याने कर्मचारी समाधानी होवून त्याचा परिणाम येथील उर्जा उत्पादन वाढविण्यात झाला असल्याचे त्यांनी सांगितले.