विविध खाद्य स्टॉलवर खवय्यांची गर्दी

0

जळगाव : महाराष्ट्र खाद्य व टुरिझम मोहत्सव सागर पार्क येथे सुरू आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या या मोहत्सवाला दुसर्‍या दिवशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या मोहत्सवात मालवणी, खान्देशी, कोल्हापुरीसह हैद्राबादी, चायनीज अशा गरमागरम खाद्यांची पर्वणी शहरवासीयांना मिळत आहे. के.ई. डब्लू. सोसायटी मराठी प्रतिष्ठान व परेश फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने जळगाव येथे 23 ते 27 डिसेंबर अशा पाच दिवसीय महाराष्ट्र खाद्य व टुरिझम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात खान्देश, मालवाणी, सावजी(नागपुरी), कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा, हैद्राबादी मटण, सुरमई तसेच पंजाबी, दक्षिण भारतीय, चायनीज, इटालियन, दिल्ली चाट, मुंबई स्पेशल खाद्य पदार्थ, आईस्क्रीम, आंब्याचा रस, नमकीन, मुखशुद्धी अशा विविध पदार्थांचे स्टॉल येथे थाटण्यात आले आहेत. शहरवासीयांनी गुलाबी थंडीत या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. शनिवारी सकाळपासून येथे आकर्षक झोपड्या उभारण्यात आल्या. खव्वयांनी तेथे बसून जेवणाचा आनंद घेतला. वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्य पदार्थ येथे आहेत. या पदार्थांसोबत ग्रामीण भागाची ओळख असलेली बैलजोडी येथे ठेवण्यात आली आहे. जेवतांना किंवा येथे आल्यानंतर बैलजोडीसोबत सेल्फी घेण्याची सोय येथे करण्यात आलेली आहे.