विविध ठिकाणच्या अपघातांमध्ये तीन ठार

0

जळगाव : महामार्गाचे चौपदरीकरणाचे खाजगी कंपनीतर्फे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी रस्ता पार करणार्‍या कंपनीच्या अभियंता सागर प्रकाश बर्‍हाटे वय 22 , रा.हनुमान नगर भुसावळ यास चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. महामार्गावर मकरा एजन्सी जवळील चर्च समोर हा अपघात झाला. दरम्यान या मार्गाने आतापर्यंत अनेक सामान्य नागरिकांचे बळी घेतले आहे. विशेष म्हणजे आजच्या अपघातात या महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीच्या अभियांत्याचाच बळी गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सहकार्‍यांनी तातडीने हलविले रुग्णालयात

अपघातानंतर जखमी बर्‍हाटे यास साईटवर काम करणार्‍या कंपनीच्या जयेश माळी, बबलू डुबे, विशाल चौधरी, यश जोशी, सुरज देवगिरकर, रितेश सिसोदीया यांनी तातडीने ऑर्किड हॉस्पिटल येथे दाखल केले. याठिकाणी सागरला उलटी झाली, अन् यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर सागरचे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप सोनार यांनी पंचनामा केला.

चार महिन्यांपूर्वी कंपनीत झाला होता रुजू सागरच्या पश्चात आई मीनाक्षी, वडील प्रकाश रामा बर्‍हाटे, भाऊ पुष्पक असा परिवार आहे. वडील भुसावळात वेल्डींग, वर्कशॉपचे काम करतात, पुष्पकचे आयटीआय पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून तो घरीच आहे. सागर हा भुसावळ शहरातील जे.टी. महाजन महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. या कंपनीत इंजिनिअर म्हणून सागर बर्‍हाटे चार महिन्यांपूर्वी रुजू झाला. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सागर कामावर आला होता. आणि 11.30 वाजेच्या सुमारास अपघाताच्या रुपाने सागरवर काळाने झडप घातली.

राँगसाईडने आलेल्या विना नंबरच्या चारचाकीची धडक

याबाबत माहिती अशी की, भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आयुष प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चौपदरीकरण करण्याचा कामाचा ठेका मिळालेला आहे. त्यानुसार दीड वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मकरा एजन्सीजवळ असलेल्या चर्च समोर काम सुरु आहे. याठिकाणी काम सुरु असतांना कंपनीचा अभियंता सागर बर्‍हाटे हे रस्ता पार करत असतांना चुकीच्या बाजूने आलेल्या विना नंबरच्या नव्या कोर्‍या चारचाकीने बर्‍हाटे यांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळाहून पसार झाला.

धरणगाव-चोपडा रस्त्यावर रिक्षा उलटली ; विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव– धरणगाव- चोपडा राज्य महामार्गावर रोटवदजवळ प्रवासी रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातातील प्रवासी विद्यार्थी रुपेश प्रकाश गायकवाड वय 17 रा. बजरंग चौक, धरणगाव या विद्यार्थ्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रुपेशचा मित्र गणेश अंकुश कोळी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रुपेशच्या छातील दुखत असल्याबाबत कुटुंबियांनी डॉक्टरांना कळविले होते, मात्र अर्धातास उलटूनही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुपेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. चोपडा तालुक्यातील वेल्हे येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात रुपेश गायकवाड शिक्षण घेत आहे. यासाठी तो रोज रिक्षाने अपडाऊन करतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे मित्र गणेश याच्यासोबत रिक्षातून रुपेश वेल्हे येथे जाण्यासाठी निघाला. नांदगाव ते रोटवद गावादरम्यान रिक्षा अचानक उलटली. यात गंभीर जखमी असलेल्या गणेश कोळी व रुपेश यास इतरांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी त्याच्या उपचार सुरु होते. यानंतर तासाभराने रुपेशचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे रुपेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद केली.

स्कूल बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक ठार

जळगाव– तालुक्यातील धामणगावजवळ स्कूल बस व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात भूषण प्रकाश भोई (वय-17, रा़ देऊळवाडे ता़ जळगाव) हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5़30 वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, या अपघात दुचाकीवर मागे बसलेला आबा घमा सोनवणे (वय-30, रा़ देऊळवाडे ता़ जळगाव) हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़ दोघेही गावाबाहेर असलेल्या शेतात जात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले़
भूषण भोई हा आसोदा गावाच्या काही अंतरावर असलेल्या देऊळवाडे येथे आई-वडील तसेच बहिणीसोबत वास्तव्यास होता़ तो शेती काम काम करायचा़ घराजवळचं मित्र आबा घमा सोनवणे हा राहतो़ तर गावाच्याबाहेर आबा याचे शेत आहे़ त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी भूषण आणि आबा दोघेही दुचाकीने शेतात जाण्यासाठी निघाले़ भूषण हा दुचाकी चालवित होता़ मात्र, धामणगावाजवळून जात असताना जळगावकडे येणार्‍या स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक भूषण याच्या छातीला तसेच हाता-पायाल गंभीर दुखापत होवून तो जागीच ठार झाला़ तर दुचाकीच्या मागे बसलेले भूषण आणि आबा दोघांनाही परिसरातील नागरिकांनी त्वरित वाहनातून त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले़ भूषण याच्या पश्चात आई-वडील व बहिण असा परिवार आहे़