एमआयटीतर्फे आयोजित ‘वर्ल्ड पार्लमेंट’च्या तिसरा सत्रातील परिसंवाद
पुणे : मानवतेचे आचरण म्हणजेच धर्म होय. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन यासह अन्य धर्मांचा समावेश असलेले विश्वधर्मी मानवता भवन उभारण्यात आले आहे. मानव कल्याणाची शिकवण धर्मग्रंथातून मानव जातीला दिली जात आहे. धर्मग्रंथाच्या माध्यमातून मानवतेला सद्भावनेचा संदेश दिला जात असल्याचे मत जैन मुनी डॉ आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अॅन्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, यांच्या वतीने विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित चार दिवसीय ‘वर्ल्ड पार्लमेंट’च्या तिसरा सत्रात ‘जगातील सर्व धर्मग्रंथ हे खर्या अर्थाने जीवनग्रंथच आहेत’, या विषयावर ते बोलत होते. यावेळी डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. विजय भटकर, आरिफ मोहम्मद खान, पं. वसंतराव गाडगीळ, भन्ते राहुल बोधी, इजिकेल आइजैक मालेकर, डॉन. आर. क्लॉर्क, प्रा. डॉ. मेहर मास्टर मूस, डॉ. एस. एन. पठाण, प्रा. रतनलाल सोनाग्रा उपस्थित होते.
अध्यात्म व विज्ञान यांचा संगम
आचार्य मुनी म्हणाले, जगातील सर्व धर्मांचे धर्मग्रंथ मानवता आणि मानवी मूल्यांची शिकवण देतात. शांती आणि सद्भावनेचा संदेश प्रायोगिक रुपाने धर्मग्रंथातून मानव कल्याणासाठी दिले जात आहेत. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संगमातून धर्मग्रंथाचा विचार जगात पसरत राहील.
डॉ. अरिफ महमंद खान म्हणाले, धर्मग्रंथांतून कोणाचाही द्वेष करू नये, असा संदेश दिला जातो. जगातील कोणत्याही व्यक्तीला दु:ख देण्याचे कार्य आपल्या हातून घडू नये.
भारत माझ्या रक्तात
डॉ. कराड म्हणाले, सर्व धर्मग्रंथ हे खरे जीवनग्रंथ आहेत. जगात अनेक धर्म आणि धर्मग्रंथ असले, तरी सर्वांचे मानवी मूल्य समान आहे.
इजिकेल आइजैक मालेकर म्हणाले, जगात ज्यू समाज खूप कमी आहे, मात्र या समाजाच्या धर्मग्रंथातून मानवीकल्याणाचा संदेश दिला आहे. इस्त्राइल हे माझ्या हृदयात असून भारत माझ्या रक्तात आहे.
बुद्ध म्हणजे सायन्स व अध्यात्म यांचे प्रतीक
भन्ते बोधी म्हणाले, गौतम बुद्ध म्हणजे सायन्स, लॉजिक आणि अध्यात्म यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे. डोळे झाकून कोणत्याही कल्पनेवर विश्वास ठेवू नका, अशी शिकवण सर्व धर्मग्रंथाच्या माध्यमातून मिळते. जगाला युद्धाची नाही, तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे. पं. वसंतराव गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.गौतम बापट यांनी केले.
सर्व धर्मग्रंथाच्या शिकवणीचा अंगीकार
प्रा. डॉ. मेहर म्हणाल्या, सर्व धर्मग्रंथात मानवकल्याणाचा एकच तत्त्वज्ञान आहे. जन्माचे उद्देश साध्य करण्यासाठी सर्व धर्मग्रंथाच्या शिकवणीचा अंगीकार करावा.
डॉन. आर. क्लॉर्क म्हणाले, जगाच्या पाठीवर विश्वशांतीसाठी एवढे मोठे प्रार्थना सभागृह मी पाहिले नाही. ही कलाकृती जगाला मानवता आणि विश्वकल्याणाची शिकवण देण्याचे कार्य अविरत करत राहील.