विविध मागण्यांसाठी डाक कर्मचार्‍यांचा संप

0

राजगुरूनगर : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनची संलग्न शाखा असलेल्या राजगुरूनगर सब पोस्ट ऑफिसच्या एनएफपीई ग्रुप ‘सी’ शाखेने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक संप पाळला. यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प होऊन नागरिकांचे अतोनात हाल झाले. राजगुरूनगर सब पोस्ट मास्तर एस. एस. करंडे व संघटनेचे पुणे ग्रामीण विभाग सचिव अनंत वाघमारे यांच्या नेतृत्त्वाखाली खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, कडूस, चास, वाडा, पाईट तसेच आंबेगाव तालुक्यातील मंचर, पेठ, अवसरी बुद्रूक, अवसरी खुर्द, लोणी, धामणी येथील पोस्टल (डाक) कर्मचार्‍यांनी राजगुरूनगर पोस्ट कार्यालय आवारात ठिय्या मांडून लाक्षणिक संप पाळला.

यांचा होता संपात सहभाग
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करणे, प्रलंबित भरती सुरू करणे, केडरची पुनर्रचना करणे, पाच दिवसांचा कामकाज आठवडा करणे व पोस्टल कर्मचार्‍याला शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा देणे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे संपकर्‍यांनी सांगितले. या संपात के. जी. डोंगरे, कविता आढारी, लोकेश चव्हाण, एम. डी. पाचंगे, साकोरे, जमधडे, मिरजे, उमाकांत बरडे, संजय आढारी, पूनम पाटील, राहुल नाणेकर आदी सहभागी झाले होते.

ग्रामीण भागातही झाला होता संप
यापूर्वी ग्रामीण भागातील डाक कर्मचार्‍यांनीदेखील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आठवडाभर संप पुकारल्याने टपाल सेवा पूर्णपणे कोलमडली होती. उपविभागीय डाकघर निरीक्षक नेहा कुमारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमच्याकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने काम ठप्प झाल्याचे सखेद मान्य केले.