शहादा। भूमिहीन कुटूंबाना पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी घरकुल योजनेमार्फत लाभ द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी तहसिल कार्यालयावर मार्चा काढण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे कुमार शिराळकर, नथ्थू सावळे, सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यासाठी तहसिलवर मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा देत मोर्चा मेन रोड, जूना प्रकाशा रोड, गुजर गल्ली, तूप बाजार, खेतिया चार रस्तावरुन तहसिल कार्यालयावर धडकला.
केंद्र-राज्य सरकार शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. माकपा कार्यालयात निनावी पत्र पाठवून पार्सलमध्ये बॉम्ब पाठविण्याची धमकी देणार्यास त्वरीत अटक करावी. गोरक्षा कायद्याच्या नावाखाली खंडणी मागणार्यांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चामध्ये बनु माळी, कमाबाई ठाकरे, संतोष गायकवाड, कैलास महिरे, प्रशांत ठाकरे, रतन पटले, उत्तम पवार, खंडू सामुद्रे, कॉ.मासूम मन्यार, कॉ.सुधीर ठाकरे, कॉ.राजाराम ठाकरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले.