विविध मागण्यांसाठी वेस्टर्न फोर्जिंगमधील कामगारांचे आमरण उपोषण

0

सणसवाडी । सणसवाडी येथील वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी कंपनीच्या गेटसमोर शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. भारतीय कामगार सेनेच्या संघटनेमार्फत सुरू असलेल्या या आंदोलनाचा रविवारी दुसरा दिवस होता. यामध्ये दोन महिला कामगारांसह 45 कामगार उपोषणाला बसले आहेत.

कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष
वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील 45 कामगारांनी वेतनवाढीचा करार तसेच त्यांच्या विविध मागण्यांचे मागणीपत्र कंपनी व्यवस्थापनाकडे 1 वर्षापूर्वीच सादर आहे. सादर मागणीपत्राबाबत कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने या विरोधात कंपनीतील कामगार भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले आहेत.

कामगारांची प्रकृती खालावली
उपोषणाच्या दुसर्‍या दिवशीदेखील कंपनी व्यवस्थापक कामगारांकडेे फिरकले नाही. त्यामुळे कामगारांनी काम बंद ठेऊन उपोषण सुरूच ठेवले आहे. दोन दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने काही कामगारांची प्रकृती देखील खालावली आहे. उष्णता वाढल्याने दुपारी दोन कामगारांना अस्वथ वाटू लागले होते. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

…तर कुटुंबियदेखिल बसणार उपोषणाला
वाढती महागाई आणि कमी वेतन यामुळे कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. कंपनी फोर्जिंग असल्याने अवजड कामे करावी लागतात. परंतु त्यानुसार वेतन मिळत नाही. कंपनीकडे वेतनवाढ व विविध मागण्यांचे मागणीपत्र सादर केले होते. त्यावर कंपनीने अद्यापपर्यंत कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. कंपनीने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा सोमवारपासून (दि. 11) कामगारांचे कुटुंबियदेखील उपोषणामध्ये सामील होणार असल्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष सचिन वाळके, उपाध्यक्ष गणेश मोरे, संदीप साबळे भारतीय कामगार संघटनेचे राज्य सदस्य अशोक हरगुडे यांनी सांगितले. काही उद्योजकांचे या कंपनीमध्ये कामगार पुरविण्याचे ठेके सुरू असल्याने याकडे नेते, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. या उपोषणाबाबत शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे तसेच सणसवाडी सरपंच रमेश सातपुते यांना निवेदन देण्यात आले आहे. या उपोषणास स्थानिक कामगार संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.

कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यास कंपनी तयार
कामगारांनी मागणीपत्र सादर केल्यानंतर वर्षभर कामगारांशी चर्चा सुरळीत सुरू होती. त्यांनतर ते कामगार आयुक्त कार्यालयाकडे गेले तेथे देखील चर्चा सुरळीत झाली. परंतु त्यांनतर कामगारांनी उपोषण व आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. परंतु कामगारांनी केलेल्या मागण्यांच्या अपेक्षा कमी कराव्यात. त्यांचे प्रश्न सोडवण्यास वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रायवेट लिमिटेड कंपनी तयार आहे.
-योगेश राजहंस, कंपनीचे मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख.