विविध वाहनांसाठी वाहनतळ निश्‍चित करणार

0
मुख्याधिकारी आवारे यांनी दिली माहिती
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरात अ‍ॅटो रिक्षा, मालवाहू रिक्षा, तसेच टेम्पो, छोटा हत्ती या वाहनासाठीचे वाहनतळ निच्छित केले जाणार असून रिक्षा चालकांनी शिस्तबध्दरीतीने सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याध्यकारी वैभव आवारे यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वाहनचालकांची सभा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेस तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, मुख्याधिकारी वैभव आवारे, सत्तारुढ पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, जेष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, विविध रिक्षा संघटनाचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.
नगरपरिषदेने केले आयोजन
तळेगाव दाभाडे शहरामध्ये वाहतुकीच्या अनेक समस्या वारंवार उद्भवत होत्या. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालू राहावी यासाठी नगर परिषदेकडून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव पोलीस ठाणे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत गेले आहे. यापुढे देहुरोड-तळेगाव या पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र वाहतूक कक्षामार्फत वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले. तर शहरातील सर्व रिक्षा चालक-मालकांना विश्‍वासात घेऊनच शहरातील वाहतुकीची स्थानके उभारावीत, असे नगरसेवक भेगडे यांनी सुचविले. नगर परिषदेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र काळोखे यांनी सभेचे नियोजन केले होते.