मुक्ताईनगर। तालुक्यातील कुर्हा काकोडा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अनेक गैरसोयींमुळे ग्राहक त्रस्त असून दर आठवड्याला किमान तीन दिवस कनेक्टीव्हिटी नसणे, बँकेत पैसा नसणे, ऐंट्री मशिन बंद असणे अशा विविध समस्यांमुळे बँकेच्या कामकाजावर अनिष्ठ परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
परिसरातील 28 खेडे बँकेशी संलग्न
कुर्हा- वडोदा परिसरातील सुमारे अठ्ठावीस खेडे या बँकेशी संलग्न असून जवळपास 20 हजार ग्राहक संख्या आहे. तसेच या परिसरात ही एकमेव राष्ट्रीय बँक असल्याने ग्राहकांची कायम गर्दी असते. मात्र सदर शाखेतीील अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना योग्य सेवा पुरविण्यास असमर्थ ठरत आहेत. कनेक्टीव्हिटी नसणे हि बाब नविन राहिली नाही.
नोटबंदीपासून कनेक्टीव्हिटीमुळे कामकाज बंद
नोटबंदीपासून या शाखेत आठवड्यात केवळ दोन ते तीन दिवसच कनेक्टीव्हीटी असते तर इतर दिवसांमध्ये नो कनेक्टीव्हिटीमुळे कामकाज बंदच असल्यामुळे ग्राहकांना तासन्तास बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. ग्राहकांनी आपल्याच खात्याविषयी विचारणा केली असता येथील कर्मचार्यांकडून त्यांना नीट माहिती तर दिली जात नाहीच उलट अरेरावीची भाषा वापरून त्यांचा अपमान करण्यात येतो. अधिकार्यांचे कर्मचार्यांवर कोणतेच बंधन राहिलेले दिसून येत नाही.
ग्राहक संतप्त
शहरात या परिसरात बहुतांश आदिवासी व अल्पशिक्षीत नागरिक आहेत. त्यांना बँकेचे व्यवहार नीट समजत नसल्यामुळे हे नागरिक कर्मचार्यांना विचारतात तर त्यांना हाकलून लावण्यात येते. त्यामुळे ग्राहक बँकेची पायरी चढायला घाबरतात. तसेच मुद्रा लोन योजनेसाठी काही सुशिक्षीत बेरोजगार येतात तेव्हा त्यांना देखील याबाबत माहिती दिली जात नाही. तांत्रिक बिघाड असल्यास ग्राहक जेव्हा याबाबत बँकेच्या कर्मचार्यांना विचारणा करण्यास जातात तेव्हा अधिकारी व इतर कर्मचारी मोबाईलवर गेम खेळण्यात मशगुल असतात. त्यामुळे ते ग्राहकांकडे फिरुनही पाहायला तयार नसतात. बँकेच्या या भोंगळ कारभाराबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून मुजोर अधिकारी व कर्मचार्यांवर वरिष्ठांकडून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.