89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा मध्यममार्ग
पुणे : 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्थळाबद्दल वाद निर्माण झाला असताना, पिंपरी-चिंचवड येथील 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मात्र या वादात मध्यममार्ग सूचविला आहे. या संमेलनाच्यानिमित्ताने स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांची बदनामी होत असल्याने विवेकानंद आश्रम या आयोजक संस्थेनेच हे संमेलन नाकारावे. अन् त्यांच्या भूमिकेचा आदर करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाने कुठेही अन्यत्र साहित्य संमेलन भरवावे. मला वाटते माझी ही भूमिका साहित्य महामंडळ, विवेकानंद आश्रम आणि ज्यांनी हा वाद उकरून काढला, त्या श्याम मानव यांनाही पटेल, अशा शब्दांत श्री सबनीस यांनी दैनिक ‘जनशक्ति‘शी संवाद साधला. संमेलनस्थळ निवडीची प्रक्रिया तर फार दिवसापूर्वीच सुरु झाली होती. त्याचवेळी श्याम मानव यांनी आपला विरोध का दर्शविला नाही? असा सवालही सबनीस यांनी उपस्थित केला.
संमेलनस्थळ अपवित्र कसे?
91 व्या साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याशी दैनिक जनशक्तिच्या संपादकीय विभागाने दिलखुलास बातचीत केली. याप्रसंगी निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे, वरिष्ठ उपसंपादक अंजली इंगवले, भक्ती शानभाग, उपसंपादक माधुरी सरवणकर, प्रदीप माळी, अजित खुलपे यांच्यासह संपादकीय सहकार्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. श्रीपाल सबनीस म्हणाले, साहित्य संमेलन हा खरे तर मराठी साहित्याचा सोहळा आहे. मराठीचे वैभव समृद्ध करणारा हा गौरवशाली सोहळा प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या वादात अडकतो. यावेळी तो अगदीच निरर्थक वादात अडकला आहे. शुकदास महाराज यांच्या विवेकानंद आश्रम या संस्थेने या सोहळ्याच्या आयोजनासाठी रितसर निमंत्रण पाठविले होते. ते महामंडळाच्या प्रक्रियेतून निवडणूक प्रक्रियेद्वारे स्वीकारले गेले. ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना, ज्यांनी संमेलनस्थळाला आक्षेप घेतला त्या श्याम मानवांनी त्याचवेळी आपली तक्रार का नोंदविली नाही. कदाचित हा प्रस्ताव त्याचवेळी नाकारता आला असता. दुसरे असे, की एखादे स्थळ अपवित्र कसे असू शकते? शुकदास महाराजांवर जे आरोप श्याम मानव हे करत आहेत, ते आरोप ते कोर्टात सिद्ध करू शकले नाहीत. डिसेंबर 2001 मध्येच कोर्टाने मानव यांना शुकदास महाराजांवर टीका करू नये, त्यांची बदनामी करू नये, अशी मनाई केली आहे. मानव यांचे काही आक्षेप असेलच तर त्यांनी कोर्टात जावे. साहित्य संमेलनाच्या स्थळाला विरोध करण्याची त्यांची भूमिका माझ्या विवेकवादी बुद्धीला पटत नाही, असेही सबनीस यांनी सांगितले.
विवेकानंद आश्रमानेच संमेलन नाकारावे!
स्थळनिवडीच्या वादातून स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषाची बदनामी होत आहे. कारण, तो आश्रम विवेकानंदांच्या नावाने आहे. अशा परिस्थितीत बदनामी टाळण्यासाठी संस्थेनेच हे संमेलन नाकारावे, असा सल्लाही याप्रसंगी श्रीपाल सबनीस यांनी दिला. खरे तर वाद हे निकोप असावेत. संवादाची प्रक्रिया खंडित न होता वाद होणे अपेक्षित आहे. आज दुर्देवाने जो वाद संमेलनाच्या शेवटी व्हायला अपेक्षित होता, तो वाद संमेलनाच्या सुरुवातीलाच झाला. त्यातून संवादाची प्रक्रियाच खंडित झाली, ही बाब चांगली नाही. संमेलन अध्यक्षाची निवड ही लोकशाही प्रक्रियेने आणि निवडणुकीद्वारेच व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल व्यक्त केली. शरद पवार यांनी याबाबत यापूर्वी माजी पाच अध्यक्षांनी एकत्र येवून नवीन अध्यक्ष निवडावा, असा सल्ला दिला होता, असे सांगून सबनीस म्हणाले, की पवारांचा हा सल्ला व्यवहारिक नव्हता. त्यातून नवीन वाद निर्माण झाला असता. त्यामुळे आपण या सल्लाला विरोध केला. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीनेच निवडला जावा, आणि लोकशाही म्हटली की निवडणूक अटळ आहे, असेही सबनीस यांनी सांगितले.
दोन समित्यांतही मतभेद!
स्व. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना हौताम्य पत्कारले. त्यांच्या समितीचे राज्य कार्याध्यश्र मिलिंद देशमुख यांनी आपण विवेकानंद आश्रमाला भेट दिली होती. तेथे असे काही चालत नसल्याचे पाहिले होते, असे सांगितले आहे. तर दुसरीकडे श्याम मानव हे शुकदास महाराजांवर आरोप करून वाद निर्माण करत आहेत. एकूणच या वादात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्या दोन संस्थांतही मतभेद असल्याचे दिसून येते, असे निरीक्षणही याप्रसंगी श्रीपाल सबनीस यांनी नोंदविले. यावेळी त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनावरही टीका केली. ते म्हणाले, विद्रोही साहित्य संमेलनाच्या पायाच मुळात करप्ट आहे. जाती अभिनिवेषाच्या पायावर उभे राहिलेले साहित्य संमेलन योग्य कसे असू शकते. कोणत्याही अतिटोकाचा जातीवाद हा ब्राम्हण्यवादच असतो. अशा ब्राम्हण्यवादाचा आपण तिरस्कार करतो, अशी भूमिकाही सबनीस यांनी याप्रसंगी मांडून, विविध मुद्द्यांवर दिलखुलास चर्चाही केली.