विवेकानंद प्रतिष्ठानच्या ‘सायन्स सर्कस’मध्ये 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

0

जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल जळगाव येथे ‘सायन्स सर्कस’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विवेकानंद प्रतिष्ठान अंतर्गत येणार्‍या ब.गो.शानभाग विद्यालय, काशिनाथ पलोड, श्रवण विकास मंदिर, या विद्यालयातील जवळपास 850 विद्यार्थ्यांनी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या सायन्स सर्कसचा लाभ घेतला. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाल्यास आत्मविश्‍वास वाढतो. या उद्देशाने माइंड वर्कस व विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल यांच्या वतीने ‘सायन्स सर्कस’चे आयोजन करण्यात आले होते. या सायन्स सर्कसच्या माध्यमातून विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा पहिला नियम, विद्यार्थ्यांना कठिण वाटणार्‍या विषयाची मांडणी करण्यात आली.

50 प्रकल्प सादर
‘हायपरबोल’ हि संकल्पना, हुक्स लॉ, पुलीचे वर्किंग, घर्षणातून विजनिर्मितीचा प्रकल्प, पृथ्वी प्रदक्षिणा,दृष्टी सातत्य, हवामानातील बदल कसा होतो दृष्टीचे अस्तित्व असे जवळपास 50 प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. सादरीकरण करत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्‍न निर्माण होत होते त्या प्रश्‍नांचे निराकरण इतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आनंदाने व स्वखुशीने तयार केलेल्या प्रतिकृती व वर्किंग मॉडेल्स हाताळून आपल्या संकल्पना स्पष्ट केल्या.

प्रात्यक्षिकातून धडे
या सायन्स सर्कसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांतून विज्ञानाचे धडे गिरविले. गणितानंतर नावडता विषय म्हणून मुले विज्ञानापासून दूर पळतात. वर्किंग मॉडेल हाताळताना जे दीर्घकालीन व उपयुक्त संस्कार मुलांवर होतात, ते आयुष्यभर उपयोगी पडणारे असतात शिक्षणातील कमतरता भरुन काढण्यासाठीच प्रकल्पांची सक्ती शालेय पातळीवरुन केली गेली आहे.

यशस्वी आयोजन
उद्घाटनाच्या सुरुवातीला सायन्स सर्कसच्या प्रमुख निलश्री सहजे यांनी या सायन्स सर्कसचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहखजिनदार पुनम मानुधने यांच्या हस्ते सायन्स सर्कसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य ज्ञानेश्‍वर पाटील, समनयक गणेश लोखंडे, माइंड वर्क एयुकेशन अ‍ॅक्टीव्हीटी बेस लर्निंगचे पराग जहागीरदार तसेच त्याच्या सोबत विनिता राजमाचीकर व अनिता राजमाचीकर हे उपस्थित होते. आभार किर्ती राजापुरे यांनी केले. सायन्स सर्कसच्या यशस्वितेसाठी प्राचार्य ज्ञानेश्‍वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.