जळगाव : शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या बौध्दिक ज्ञानासह शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाच्या दृष्टीने त्यांच्या अंगीभूत असलेल्या क्रीडा गुणकोशल्यांना योग्य संधीद्वारे वाव मिळावा यासाठी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी या महोत्सवात सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विविध कसरती देखील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. सदर क्रीडा स्पर्धा शिवछत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर सुरू आहेत.
स्पर्धेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडागीत सादर केले. यानंतर प्रतिष्ठान परिवारातील विविध विभागातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर खेळून आलेल्या व विशेष प्राविण्य मिळविलेल्या साक्षी निकम, समिक्षा लुले, पायल बडगुजर, कांचन बडगुजर, जान्हवी पाटील, सिध्दी जोगी, भूमिका अहिरराव, शंतनू पिंपळे व राज्यस्तरावरील खेळाडू भूपेन पाटील, कुणाल ठाकरे, सुमीत बडगुजर, भावेश महाजन, पायल मोराणकर, संचली देशमुख, ऋतुजा पाटील, ईशा पाटील, चि. ध्रुव काबरा, नचिकेत ठाकूर, राष्ट्रीय पातळीवरील यश चौधरी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेली क्रीडा मशाल शिस्तबध्द, पथसंचलन करीत प्रमुख अतिथी यांच्या हाती सोपवली. यानंतर प्रमुख अतिथी यांच्याशुभहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. तसेच क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे मल्लखांब प्रात्यक्षिक
शानभाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषपथकाद्वारे शिस्तबध्द, तालबध्द संचलन सादर केले. काशिनाथ पलोड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे सुरेख साहसी क्रीडाप्रकाराचे प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवून घेतली. विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी विभागाद्वारे साहसी खेळप्रकारात लाठी-काठी प्रात्यक्षिकांसह, फायर रिंगमधून उडी मारणे, फायर स्टीक, भंवरा इत्यादीचे प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय यादव यांच्यातर्फे क्रीडा शपथ देण्यात आली.
तसेच क्रीडा पुजन झाल्यानंतर 12 वर्षे, 14 व 17 वर्षे वयोगटातील डॉ. अविनाश आचार्य प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मिडियम स्कूल, ब.गो.शानभाग विद्यालय, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल तसेच श्रवण विकास मंदिर या विभागांच्या विद्यार्थ्यांचे सामने घेण्यात आले. यामध्ये फुटबॉल, लंगडी, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, रस्सीखेच, बुध्दीबळ, लांबउडी, 400 व 100 मीटर रिले धावणे, गोळाफेक या खेळांचा समावेश केलेला होता. आ 22 रोजी मैदानी स्पर्धा, फुटबॉल, खो-खो, बुध्दिबळ, लंगडी, कबड्डी व व्हॉलीबॉल, 400 व 100 मीटर रिले धावणे या स्पर्धांना सुरुवात झाली.
यांची होती उपस्थिती
आंतरशालेय क्रीडा महोत्सवात अतिथी म्हणून जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त जीवन सोनवणे, यांचेसह विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, संस्थेच्या सदस्या पूनमताई मानुधने, प्रशासकीय प्रमुख दिनेश ठाकरे, सी.बी.एस.ई. विभाग काशिनाथ पलोड स्कूलचे प्राचार्य सुहास मुळे, ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, इंग्लिश मिडीयम विभागाचे प्राचार्य जयंत टेंभरे, श्रवण विकास मंदिर, कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत पाटील, बस विभागप्रमुख मिलींद पुराणिक, शैलजा पप्पू, संध्या देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विद्यालयाचे विद्यार्थी चिन्मय जगताप, गौरव मोकाशी, मृणाल सहजे, सानिका पाटील यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक संजय यादव यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानमधील सर्व विभागांचे प्रमुख क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले.