जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागात गोविंदा आला रे आला च्या गजरात दि. ३ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
पूर्व प्राथमिक विभागात गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील , व सेमी विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील , समन्वयिका सविता कुलकर्णी तसेच छोट्या बाळ गोपाळांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजनाने झाली. त्यानंतर शुभांगी चौधरी यांनी जन्माष्टमीची माहिती सांगितली व कार्यक्रम प्रमुख मंजुषा साळूंखे यांनी श्रीकृष्ण व सुदामाच्या मैत्रिची कथा सांगितली.
सिनि. केजीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांचे ‘रासलिला नृत्य’ सादर केले. त्यानंतर गोविंदा पथकाने व इतर मुलांनी दुहेरी थर रचून दहिहंडी फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटला. ‘गोविंदारे गोपाळा’, गोविंदा आला रे आला अशा विविध गाण्यांवर सर्व विद्यार्थी बेधूंद होवून नाचले. सगळीकडे जणू गोकूळचं अवतरले होते. शेवटी विद्यार्थ्यांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभागात हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की च्या जय घोषात दहिहंडी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्रीकृष्णाच्या पाळण्याचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील सर, व सेमी विभागाचे मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर, प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. रत्नमाला पाटील, माध्यमिक विभागाचे समन्वयक श्री. गणेश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागातील विद्यार्थी दक्षेश देवरे याने केले, तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीची गोष्ट मोनिका माळी या विद्यार्थीनीने सांगितली. यानंतर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णांवर आधारित विविध गाणे सादर केली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वाजत गाजत दहिहंडी फोडली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पंकज कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील यांचे सहकार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.