मुंबई : सध्या मॅचफिक्सिंगचे वारे जोरात वाहत आहेत. नुकतीच श्रीलंकेचा वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याने 2011 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याची चौकशी करावी, असे खुले आव्हान त्या सामन्यात कर्णधाराची भूमिका निभावणार्या कुमार संगकाराला दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगच्या चर्चेला उधाण आले होते. मॅचफिक्सिंगचे हे आरोप सिद्ध झाले तर करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींच्या स्वप्नांची राखरांगोळी होईल. पण आता भारतीय बुकी विशाल कारिया याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी याचिका गणेश मधुकर पवार याने केली आहे. त्यामुळे बुकी विशाल कारियाच्या अडचणीत वाढ होणार आहे.विशाल कारिया हा मुंबईतील व्यावसायिक असून त्याचे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणी तसेच ऑफस्पिनर हरभजन सिंग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंशी जवळचे संबंध आहेत.
विशाल आणि त्याचा दुबईतील साथीदार हितेश संघवी हे दोघेही मॅचफिक्सिंगच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यामुळे या दोघांनी भारतीय संघातील क्रिकेटपटूंवर कोट्यवधी रुपयांची खैरात करून काही सामन्यांत मॅचफिक्सिंग केल्याचा संशय आहे. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गणेश पवार या सच्च्या क्रिकेटप्रेमीने केली आहे. विशाल कारिया सध्या मोकाटपणे फिरत असून मॅचफिक्सिंगसारखी गैरकृत्ये करत आहे. त्यामुळे त्याला लवकरातलवकर अटक करण्यात यावी, असेही या याचिकेत म्हटले आहे. विशाल कारिया आणि भारतीय क्रिकेटपटूंमधील मैत्री ही फक्त व्यवसायापुरती मर्यादित नाही. त्यात अनेक लागेसंबंध असल्याची माहिती फक्त मोजक्या जणांनाच आहे. विशाल कारिया आणि त्याचे साथीदार मॅचफिक्सिंगसारखे गैरप्रकार करून करोडो चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे विशाल कारियासारख्या बुकीला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे गणेश पवारने याचिकेत म्हटले आहे. गणेश पवार यांच्यातर्फे वकील अमर भट्ट यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.