पिंपरी- विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांवर केली जाणारी सक्ती अन्यायकारक आहे. त्यामुळे अशा शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. शहरातील बहुसंख्य शिक्षण संस्था चालकांकडून तसेच शाळांकडून आम्ही ठरवलेल्या दुकानातूनच गणवेश, बूट, पुस्तके, दप्तरे याची खरेदी करण्याची सक्ती करत आहेत. या सक्तीमुळे पालकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. हे विक्रेते सक्तीचा गैरफायदा घेऊन मनमानी पध्दतीने साहित्यावर शुल्क आकारणी करतात. यामध्ये संबंधित शाळांना कमिशन मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही एक प्रकारे पालकांची लूट सुरु आहे. डोनेशनच्या नावाखाली पालक शैक्षणिक शुल्क भरुन मेटाकुटीला आले आहेत. पाल्यांच्या त्यांच्या आवडीचा गणवेश, बूट , दप्तर, वॉटर बॅग, वह्या, पुस्तके आदी शालेय साहित्य हवे असते. पालक त्यांना परवडेल, सोईस्कर ठरेल, असा दुकानांमधून हे साहित्य खरेदी करत असतात.