पुणे । देशाला सशक्त बनवायचे असेल तर, समाजातील सर्व घटकांना घेऊन पुढे जायला हवे. समाजातील विशेष मुले ही केवळ त्यांच्या पालकांची किंवा शिक्षकांची जबाबदारी नाही, तर ते आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे करुन त्यांना समर्थ करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
पुणे – हिंद शक्ती सोशल फाउंडेशन व विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सुह्रद मंडळ संचलित बधिर मूक शिक्षण केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय आपटे, नगरसेविका निलीमा खाडे, हेमचंद्र दाते, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता उबाळे, डॉ. वासंती देशपांडे, जयश्री नाईक, पुरुषोत्तम पाटील, आयोजक सुनील पांडे, अभिजीत मोडक, भूषण मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक पातळीवरील मदत महत्त्वाची
अभय आपटे म्हणाले, विशेष मुले देखील सक्षम आहेत. परंतु ते आपल्यापेक्षा वेगळ्या आणि अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम आहेत. मदतीसाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा, स्थानिक पातळीवरील मदत कशा पद्धतीने मिळविता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शासनाने देखील दिव्यांगांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्याचा वापर करीत विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा.
वाजपेयी अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व
शिरोळे म्हणाले, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कामातून नेहमीच प्रेरणा मिळते. सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांचे अनुकरण करायला हवे. इथून पुढेही त्यांच्याच कामाचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी पुढे जावे.