पुणे । विविध फुले, रंगिबेरंगी झुरमुळ्या अन् फुग्यांनी सजलेल्या दहीहंडी.. पांरपारिक वेषभुषेत नटलेले चिमुकले.. ढोल ताशांचा निनाद .. अन् या निनादाचा आनंद लुटणारी व फुगडी खेळणारी मुले.. हंडी फुटल्यावर केलेला जल्लोष अशा उत्साही वाताववरणात विशेष मुलांनी गुणवंतांच्या दहीहंडीचा आनंद लुटला. जनमित्र फाउंडेशन आणि अखिल सदाशिव पेठ दहीहंडी उत्सव समितीतर्फे कर्वे रस्ता तरडे कॉलनीतील जीवनज्योत मंडळ येथे विशेष मुलांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन ज्योत मंडळच्या मीना इनामदार, उषा गोसावी, जनमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर आदी उपस्थित होते.
एक लाखांची मदत
समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेल्या या विशेष मुलांना सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता आयोजित कार्यक्रमात चिमुकल्यांसह विशेष ज्येष्ठांनीही सहभाग घेतला होता. नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्टने वादन करून कार्यक्रमात रंगत आणली. दहीहंडी उत्सवाचा खर्च टाळून फाउंडेशनतर्फे गरजूंना मदत दिली जाते. यावर्षीच्या कार्यक्रमात जीवनज्योत संस्थेला चार कपाटे, दोन संगणक टेबल आणि इतर वस्तू व रक्कम स्वरुपात 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली.
एकात्मतेचा संदेश
दहीहंडी या संपूर्ण देशातील लोकप्रिय आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे. याची जाण ठेऊन आम्ही दरवर्षी गुणवंतांची दहीहंडी हा उपक्रम राबवितो. यंदा समाजातील वेगळ्या पण तितक्याच गुणवंत असलेल्या विशेष मुलांसोबत हा उत्सव साजरा करण्यात आला. यापूर्वी सेवासदन शाळेसह अंध मुलांसाठी काम करणार्या शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती राघवेंद्र मानकर यांनी यावेळी दिली.