लायन्स क्लब ऑफ फिनिक्सचा उपक्रम
निगडीः ‘संवेदना उद्यान’ हा खूप आगळावेगळा प्रकल्प असून कामायनीतल्या ‘विशेष’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची मोलाची मदत होईल. मतिमंद आणि गतिमंद असलेल्या ‘विशेष’ मुलांना रंग, गंध, स्पर्श, स्वाद आणि नाद या पंचसंवेदनांचे सहजपणे आकलन व्हावे म्हणून खास शास्त्रीय पद्धतीने संवेदना उद्यान उभारण्यात आले आहे, असे मत लायन्स क्लब पुणे जिल्हा उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांनी व्यक्त केले. येथील कामायनी शाळेत लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी पेठे बोलत होते. लायन्स क्लब पुणे जिल्हा उपप्रांतपाल अभय शास्त्री, विभागीय अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, फिनिक्सचे अध्यक्ष डॉ. संजय लकडे, सचिव शशांक फाळके, कामायनी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप मोघे, सचिव सुहास नागरे, कार्यवाह संगीता कुमठेकर, रवींद्र सातपुते, उज्ज्वला कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जाणिवांची अनुभुती व्हावी
प्रास्ताविक करताना डॉ. संजय लकडे म्हणाले की, पंचेंद्रियांच्या माध्यमातून होणार्या जाणिवांची अनुभूती विशेष मुलांना व्हावी. तसेच त्यांना निसर्गाचे सान्निध्य लाभावे या उद्देशाने फिनिक्सने संवेदना उद्यान प्रकल्पाची यशस्वी उभारणी केली. प्रमुख पाहुणे अभय शास्त्री यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या अनेक संस्था आहेत. परंतु दान हे सत्पात्री असावे या निकषावर कामायनी संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. याप्रसंगी संवेदना उद्यान उभारणीत विविध मार्गाने ज्यांचे योगदान लाभले त्या व्यक्तींचा हस्ते कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विशेष मुलांनी बँड वाजवून पाहुण्यांचे स्वागत केले. संगीता शाळिग्राम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शशांक फाळके यांनी आभार मानले.