प्लास्टिक सापडल्यास पाच हजारांचा दंड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पर्यावरण संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी अ, ब क्षेत्रीय कार्यालयात प्लास्टिक व थर्माकॉल वेस्ट संकलन मोहिमेत सुमारे 391 किलो प्लास्टिक व 3 किलो थर्माकोल संकलित करण्यात आला. अ क्षेत्रीय कार्यालयातील प्लास्टिक व थर्माकॉल वेस्ट संकलन मोहिमेचा प्रारंभ पिंपरी भाजी मंडई येथुन करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अ प्रभाग सभापती केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, पर्यावरण समिती अध्यक्ष विकास पाटील, सदस्य सुर्यकांत मुथियान, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यावेळी उपस्थित होते. एम. एम. शिंदे सहा आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एन. जी. गायकवाड, भुषण शिंदे, दीपक कोटीयाना, राहुल झिंगाडे, प्रकाश गायकवाड, एम. एम. पानसे यांनी केंद्रप्रमुख म्हणुन कामकाज केले. अ क्षेत्रीय कार्यालय निगडी, डी मार्ट चिंचवड, सेंट्रल मॉल पिंपरी, बिग बझार चिंचवड, स्टार बाजार मॉल, आकुर्डी येथील संकलित केंद्रातुन सुमारे 145 किलो प्लास्टिक व 2 किलो थर्माकोल संकलित करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय चिंचवड, शिवाजी चौक वाल्हेकरवाडी, गांधीपेठ चिंचवडगाव, डीमार्ट रावेत, नागसेन नगर व वाल्हकरवाडी दळवीनगर येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलित केले. क्षेत्रिय अधिकारी संदिप खोत, के. डी. दरवडे सहा आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. पी. वाटाडे, व्ही. एम. सरवदे, कांचनकुमार इंदलकर, संजय गेंगजे यांनी कामकाज केले. येथे एकुण 43 किलो प्लास्टिक व 1 किलो थर्माकोल संकलित करण्यात आला.
निगडीमध्ये 203 किलो प्लास्टिक
फ क्षेत्रीय कार्यालय टिळक चौक निगडी, कस्तुरी मार्केट कृष्णानगर, चिखली चौक, रुपीनगर पोलिस चौकी जवळ, मनपा व्यायामशाळा तळवडे चौक येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलित केले. मनोज लोणकर क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर व डी. जे. शिर्के सहा आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. यु. गणगे, वैभव घोळवे, पाटिल सतिश, अमित पिसे यांनी कामकाज केले. येथे एकूण 203 किलो प्लास्टिक संकलित करण्यात आले. प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून, कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. पहिला गुन्हा 5 हजार दंड, दुसरा गुन्हा 10 हजार दंड व तिसरा गुन्हा 25 हजार दंड व तीन महिने इतक्या मुदतीचा कारावास असा दंड आहे. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
शनिवारी ड क्षेत्रीय कार्यालय रहाटणी, मोर रिटेल शॉपींग सेंटर पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व वाकड येथील आरोग्य निरीक्षक कार्यालय येथे, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगांव, 16 नंबर बस स्टॉप, डांगे चौक थेरगाव, डी मार्ट काळेवाडी येथे आणि ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी, आचार्य अत्रे रंग मंदिर संत तुकाराम नगर, मेगामार्ट फुगेवाडी, सांगवी कर संकलन कार्यालय, शहिद भगतसिंग मनपा शाळा दापोडी व आरोग्य निरीक्षक कार्यालय साई चौक येथील संकलन केंद्रांवर प्लास्टिक व थर्माकोल संकलित केले जाणार आहे.