मुंबई : परळ येथे विशेष सरकारी वकील मनोहर नामदेव कंदलकर (60) यांच्यावर दोन अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर दोन आरोपी तरुण पळून गेले असून त्यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी हत्यच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मनोहर कंदलकर हे वयोवृद्ध वकील माहीम येथील मनोरमा नगरकर मार्गावरील बाळ गोविंद सहकारी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील बी-7 मध्ये राहतात. मॉडेल प्रीती जैनने सिनेदिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप केल्यानंतर या खटल्यात ते विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.
पेव्हर ब्लॉक फेकून मारला
ते त्यांच्या कारने विशेष सत्र न्यायालयाच्या दिशेने जात असताना परळ येथे येताच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने पेव्हर ब्लॉक फेकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बाजूला झाल्याने त्यांना दुखापत झाली नाही. त्यानंतर दुसर्या तरुणाने कारच्या बाजूने पुन्हा पेव्हर ब्लॉक फेकून कारच्या काचा फोडल्या.या घटनेनंतर ते दोघेही मोटारसायकलवरून पळून गेले. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.