येरवडा । उत्तरेकडून पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून विश्रांतवाडी या उपनगराकडे प्रामुख्याने पाहिले जात आहे. कारण या परिसरातूनच श्री क्षेत्र आळंदी, आंतराष्ट्रीय लोहगाव विमानतळ, येरवडा कारागृह व पुणे शहराकडे मार्ग जात असल्यामुळे विश्रांतवाडी चौकात नेहमीच वाहतूककोंडी होत असते. विश्रांतवाडीसह धानोरी, कळस या भागात लोकसंख्या वाढीबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. याच्यावर उपाययोजना म्हणून स्थानिक नागरिकांनी व स्थानिक राजकीय नेत्यांनीही उड्डाणपुलाची मागणी केली आहे.
व्यावसायिकांना मोकळे रान सापडले
महापालिकेच्या वतीने जरी सुंदर शहर म्हणून गाजावाजा करत असले तरी पण पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आजपर्यंत परिसरात कोणत्याही प्रकारे कारवाई न केल्याने व्यावसायिकांना मोकळे रान सापडले असून व्यावसायिक व पालिका अधिकारी यांच्यामध्ये अर्थपूर्ण देवाण-घेवाण होत असल्यामुळेच परिसरात कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याची शंका नागरिकांमध्ये होत आहे. यासंदर्भात अनेक पक्ष व संघटनांनी आवाज उठवून देखील पालिकेने नागरिकांच्या समस्येकडे पाठ फिरविले असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिस कर्मचारी असूनही
वाहतूककोंडीची समस्या मार्गी लावावी या उद्देशाने वाहतूक नियंत्रण कक्षाच्या वतीने जरी पोलीस कर्मचारी नेमण्यात आले असले तरी पण त्यांची असणारी संख्या ही अपुरी पडत असल्यामुळे या मुख्य चौकात जर उड्डाणपूल झाल्यास हडपसर, कात्रज, औंध आदी उपनगरासह या भागातील देखील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. व चौकातील अनेक रस्ते हे मोकळा श्वास घेतील हे मात्र नक्की!
विश्रांतवाडी-आळंदी मार्गावर कोंडी
विविध सुविधांपासून हा परिसर बहुतांशी वंचित राहिला आहे. या परिसरात भाजी मंडई नसल्याने अनेक भाजी विक्रेत्यांसह व्यावसायिकांनीदेखील अनधिकृत हातगाड्या उभारल्याने परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळत आहे. भाजी व इतर विक्रेते यांनी रस्त्यालगतच ठाण मांडल्याने परिसरात वाहनतळ नसल्याने येणारे ग्राहक हे आपले वाहन रस्त्यावरच उभे करत असल्याने व मासेविक्रेत्यांनी देखील रस्त्यालगतच दुकाने थाटल्याने ग्राहक हे असणारे वाहन हे रस्त्यावरच लावत असल्याने नेहमीच विश्रांतवाडी-आळंदी मार्गावर वाहतुकीचा सामना वाहनचालकांना करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातच एखाद्या ग्राहकास वाहनाचा जरी थोडासा धक्का लागला तर अशा ग्राहकांच्या दहशतीचा सामना वाहनचालकांना करण्याची वेळ येत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये याबाबत धास्ती निर्माण झाली आहे. तर लोहगाव मार्गावर बसडेपो जरी उभारण्यात आले असले तरी पण याठिकाणी अशापद्धतीने परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच विश्रांतवाडी चौकातून धानोरी भागाकडे जाणार्या मार्गावर अवैध वाहतूक रिक्षांनी रस्त्यावरच कब्जा केला असून या भागाकडे जाणारा मार्ग अरुंद व झोपडपट्टयांनी वेढलेला आहे.
लक्ष घालावे
परिसराची वाढती लोकसंख्या घेऊन या चौकात खरोखरच उड्डाणपुलाची गरज असून याकडे पालिकेने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.
– भालचंद्र कसबे
संस्थापक, मराठवाडा विकास महासंघटना