विश्रांतवाडीतील बेकायदेशीर गांजासाठा करणार्‍या अड्ड्यावर छापा

0

अड्डाचालक सुरज व त्याचा भाऊ फरारी

विश्रांतवाडी : बेकायदेशीर गांजासाठा करून त्याची विक्री करणार्‍या तसेच जुगार अड्डा आणि देशी – विदेशी दारू चोरुन विकणार्‍या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 14 लाख 17 हजार 495 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसहित नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग, विश्रांतवाडी पोलीस आणि गुंडा स्कॉड उत्तर विभाग यांनी गुरुवारी दुपारी संयुक्तरित्या केली. सोनाली विनोद माचरेकर (वय 38), उषा माचरेकर (वय 27), नजिना मनोहर माचरेकर (वय 65), अनिल अरुण देठे (वय 24), सचिन सोन्याबापू गवते तसेच जुगार खेळण्यासाठी आलेले बालाजी यशवंते (वय 24), अन्वर अनिल सय्यद (वय 24), सतीश येडबा गायकवाड (वय 38, सर्वजण रा. स.न. 40 भीमनगर धानोरी रास्ता, विश्रांतवाडी) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. अड्डाचालक गुंड्या उर्फ सुरज माचरेकर आणि त्याचा भाऊ रणजित माचरेकर फरार झाले असून त्यांचा शोध चालू आहे.

14 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुरुवारी खडकी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, भीमनगर झोपडपट्टी टिंगरे नगर येथे छापा टाकण्यात आला. यावेळी 58 किलो 305 ग्राम गांजा, देशी विदेशी मद्याच्या 541 बाटल्या, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 4 लाख 29500 असा एकूण 14 लाख 17 हजार 495 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. वरील आरोपींच्या विरोधात नार्कोटिक्स ऍक्ट, जुगार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपयुक्त दीपक साकोरे, पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश गावडे, विश्रांतवाडी ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता पाटील, निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी आणि कर्मचार्‍यांनी केली.