पुणे । विश्रांतवाडी येथे पूर्वीच्या ठिकाणीच रिक्षा पासिंगची व्यवस्था व्हावी, छोट्या गाड्यांसाठी 100 मीटर अंतरात पासिंगला सरकारने मान्यता द्यावी, पुण्यातील रिक्षाचालकांना सासवड येथील पासिंग ट्रॅकवर पाठवू नये, नवीन रिक्षा विक्रीमध्ये रिक्षा विक्रेते (डीलर) जास्त पैसे घेऊन रिक्षा विकत आहेत, अशा रिक्षा विक्रेते आणि कंपनीवर कारवाई करावी, रिक्षाची जीएसटी कमी करावी, बेकदेशीर जाहिरात करणा-या ओला कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा. यांसारख्या विविध मागण्यांसंदर्भात ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांच्या सोमवारी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवनेरी रिक्षा संघटना, आम आदमी रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन, प्रयदर्शनी रिक्षा संघटना आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी आनंद अंकुश, प्रतीक साळेकर, आनंद तांबे, नितीन शिंदे, दत्ता पाटील, विजय रवळे, प्रदीप भालेराव, गणेश वैरट, साई मोटाडू, सुनिल देवकुळे, रमेश पाटील, चिमाजी मोरे, समीर शेख, संजय अधिकारी, संदीप थोपटे, अनिल कांबळे, राजूगोपी लांडगे, सादिक पटेल, तोफख खान, हनिफ शेख आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, शहरातील रिक्षा चालकांना सासवड येथे पासिंगसाठी जावे लागणार आहे, हा प्रकार रिक्षाचालकांना त्रासदायक आहे. आपल्या शहरात रिक्षा पासिंगसाठी अद्ययावत ट्रॅक नाही, याबाबत पाठपुरावा न केल्यामुळे रिक्षाचालकांना त्रास होत आहे. पिंपरी-चिंचवड येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पाठपुरावा केल्यामुळे अद्यावत पासिंग ट्रॅक उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड येथील सहा हजार रिक्षाचालकांसाठी पासिंग ट्रॅक उपलब्ध होऊ शकतो, तर मग पुण्यातील पन्नास हजार रिक्षा चालकांसाठी ही सुविधा उपलब्ध का होत नाही? प्रशासनाने विश्रांतवाडी येथे अद्ययावत पासिंग ट्रॅक उपलब्ध करावा, रिक्षा विक्रीमध्ये काळाबाजार करणार्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
पासिंग ट्रॅकचे आश्वासन
शिष्टमंडळाने पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी बाबासाहेब आजारी यांनी छोट्या वाहनांसाठी 100 मीटर पासिंग ट्रॅकला मान्यता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, 100 मीटर ट्रॅकला मान्यता मिळाल्यास विश्रांतवाडी येथे तीन ट्रॅक निर्माण होऊ शकतात असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. आरटीओ कार्यलयासमोर रिक्षा चालकांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात घोषणाबाजी केली. रिक्षा पासिंग ट्रॅक उपलब्ध झालाच पाहिजे, रिक्षा विक्री मधील काळा बाजार थांबलाच पाहिजे परमिट घोटाळा करणार्यांवर कारवाई केलीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.