पुणे : विश्रांतवाडी परिसरातील धानोरी रस्त्यावर असणार्या एका खाणीतील पाण्यात उडी मारून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दोघांमध्ये झालेल्या वादातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोघांचेही मृत्यदेह अग्निशामक दल व विश्रांतवाडी पोलिसांनी बाहेर काढले. सनी अशोक जगताप (28, रा. वडार वस्ती, विश्रांतवाडी) व शीतल दत्तू गायकवाड (22, रा. गांधीनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेमसंबंधातून झाला होता वाद
सनी व शीतल दोघेही विमाननगर परिसरातील एका खाजगी कंपनीत हाऊस किपिंगचे काम करत होते. तीन महिन्यापूर्वी सनी जगताप याने तेथील काम सोडले होते. सध्या तो विश्रांतवाडी येथील एका दुकानात नोकरी करत होता. शीतल ही मूळची सोलापूरची आहे. ती पुण्यात येरवडा परिसरात तिच्या मावशीकडे राहत होती. या दोघांचे तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. सोमवारी सकाळी दोघे आठच्या सुमारास खाणीजवळ फिरत असताना नागरिकांना दिसले होते. दरम्यान, अंबानगरी येथील खाणीतील पाण्यात कोणीतरी उडी मारली आहे, अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला सकाळी आठ वाजता मिळाली. त्यानंतर विश्रातवाडी पोलिसांनी येथे धाव घेतली. अग्निशमन दलालाही नागरिकांनी माहिती दिली होती.
आधी शीतलचा नंतर सनीचा आढळला मृतदेह
पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना पाण्यात शीतलचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी शीतलचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सनी जगतापचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, दीडतासाच्या शोधानंतर अग्निशामक दलाला सनीचा मृत्यदेह सापडला. सनी विश्रांतवाडी येथील राहणारा असल्याने त्याची ओळख तात्काळ पटली. मात्र, शीतलची ओळख पोलिसांना पटत नव्हती. पोलिसांना सनीच्या खिशात शीतलचा फोटो आढळला. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, शीतलची ओळख पटली. तसेच, या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे समजले. दोघांमध्ये झालेल्या वादातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सनी व शीतल यांच्या आत्महत्येची घटना वार्यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी पाहण्यासाठी याठिकाणी धाव घेतली. दरम्यान, याघटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.