पुणे : गेल्या काही वर्षांत पुस्तकांची संख्या वाढली आहे. वाचनाची माध्यमे बदलली आहेत. त्यामुळे वाचनसंस्कृती लयाला गेली हा भ्रम आहे. चांगल्या लेखकांडून सर्जनशील निर्मिती होत आहे. आपण वाचक म्हणून त्यांच्या लेखनाला मनापासून दाद द्यायला हवी. कारण त्यातूनच लेखकाला नवनिर्मितीची प्रेरणा, उत्साह आणि ऊर्जा मिळत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी केले.
विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या व्हीपी बुक क्लबच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ‘काय वाचावं? कसं वाचावं?’ या विषयावर संजय जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहत्यिक भारत सासणे होते. याप्रसंगी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत अगरवाल, संपादक मनोहर सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आदी उपस्थित होते.