मुंबई : विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेत जसप्रीत बुमराह भारतासाठी हुकमी एक्का तर प्रतिस्पर्ध्यांसाठी एक घातक गोलंदाज ठरेल असं भाकीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वर्तवलं आहे. बुमराहच्या खेळाचं सचिनने कौतुकही केलं आहे.
विश्वचषक २०१९ सुरू होण्यासाठी आता काही महिनेच उरले असून विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांमध्ये यंदा भारताची गणना केली जाते आहे. तेव्हा भारताचे सर्वात तगडे खेळाडू कोण याबद्दल सचिन तेंडुलकरला विचारलं असता त्याने जसप्रीत बुमराहचे नाव घेतले.
‘बुमराहने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत सातत्याने त्याचा खेळ त्याने सुधारला आहे. २०१८ जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या मालिकेत बुमराहने कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यातही त्याने उत्तम प्रदर्शन केलं आहे.
बुमराहची गोलंदाजी फसवी, दिशाभूल करणारी आणि घातक आहे. फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा अंदाजही घेता येत नाही. यामुळेच तो एक खतरनाक गोलंदाज ठरतो’ असं प्रतिपादनही सचिनने केलं आहे.