नागपूर: महाविकास आघाडीचे सरकार फारकाळ टिकणार नाही असे माजी मुख्यमंत्री विधान सभेचे विरोधी पक्षनेते वारंवार सांगत आहेत. आज गुरुवारीही देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी फडणवीसांनी शिवसेनेला अधिक लक्ष केले. जनादेशाशी बेईमानी करून हे सरकार बनले आहे. हे सरकार विश्वासघाताने आणि बेईमानीने बनले असून फारकाळ टिकणार नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
आजपर्यंत एकमेकांचे तोंड न पाहणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेते एकत्र आले आणि त्यांनी हे सरकार स्थापन केले. मात्र जनतेने त्यांना जनादेश दिला नव्हता. जनादेश हा युतीच्या बाजूने होता. युतीत निवडणूक लढून नंतर युतीचे सरकार न बनवून शिवसेनेने जनतेचा अपमान केला आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना राज्याचे मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. कृषी मंत्री अजून राज्याला मिळाला नसून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले.