विश्वास पाटलांविरोधात गुन्हा दाखल होणार!

0

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास भ्रष्टाचारप्रकरणी मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. विश्वास पाटील यांनी निवृत्त होण्याआधी गतिमान कारभार करत, 5 दिवसात 450 फायलींवर सह्या केल्या आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी टीकेची झोड उठविली होती. पाटील यांनी निवृत्तीच्या महिन्याभर आधी सह्या केलेल्या फायलींच्या फेरतपासणीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या एका समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीला 15 दिवसांमध्ये अहवाल द्यावा लागणार आहे.

महिनाभरातील फायलींची होणार चौकशी
विश्वास पाटील हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या निवृत्तीला पाच दिवस शिल्लक असताना त्यांनी गतिमान कारभार करत तब्बल 450 फाइली निकालात काढल्या. पारदर्शकता आणि गतिमानतेचा वारंवार उच्चार करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यामुळे धक्का बसला होता. विश्वास पाटील यांच्यासारख्या साहित्यिकाने प्रशासकीय कामात दाखवलेली ही गतिमानता चर्चेचा विषय ठरली आहे. पाटील यांनी सह्या केलेल्या सर्व फायली प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. मात्र फक्त 200 फायलीच या अधिकार्‍यांच्या हाती लागल्या आहेत. अखेरीस पाटील यांनी निवृत्तीच्या महिनाभराच्या कालावधीत निकालात काढलेल्या सर्वच फायलींची आता चौकशी होणार असून, त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.