राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची विधानसभेत माहिती
चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ
मुंबई:- मुंबईतील एसआरए (झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. आमदार संतोष दानवे, सुनिल शिंदे, सुनिल प्रभू, यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या काही दिवस आगोदर १३७ फाईलींना तात्काळ मंजूरी दिली होती. अतिजलद मंजूरी दिलेल्या १३७ फाईली पैकी ३३ प्रकरणात गैरव्यवहार व अनियमितता असल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणात कोकण विभागीय आयूक्तांकडून चौकशी करण्यात येत अशी माहिती राज्यमंत्र्यांनी उत्तरात दिली. यावेळी विश्वास पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी असतांना काही गैरव्यवहार केला असल्याचे प्रकरण आहे. त्याची चौकशी देखील काय झाली आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या आगोदर ज्या फाईली मंजूर केल्या आहेत त्यामध्ये विश्वास पाटील यांच्या पत्नी या सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उत्तस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच विषयावर बोलतांना सांगितले की, विश्वास पाटील यांनी नेमक्या कोणत्या ३३ फाईलींना मंजूरी दिलेली आहे त्यांची यादी सभागृहासमोर सादर करा. एसआरए चा घोटाळा हा खूप मोठा घोटाळा आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती वायकर देवून यासंदर्भात निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी, पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांनी केली.मुंबईतील झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली होती.