विश्व हॉकी लीग स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

0

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून विश्व हॉकी लीग उपांत्य स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. नियमित कर्णधार पी.आर.श्रीजेशच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार असून भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. ब गटात भारतासह कॅनड, हॉलंड, पाकिस्तान व स्कॉटलंड या संघाचा समावेश आहे.

उपकर्णधारपदी चिंगलसेना सिंगची निवड
श्रीजेशला गत महिन्यात झालेल्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे संपुर्ण स्पर्धेला मुकला होता. डॉक्टरांनी त्याला तब्बल दोन महिने विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तो या स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती हॉकी इंडियाने यावेळी दिली. श्रीजेशच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. उपकर्णधारपदी चिंगलसेना सिंग असेल. तसेच प्रदीप मोर व कोथाजित सिंग या युवा खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. सुलतान अझलन शाह स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. विश्व हॉकी लीग उपांत्य स्पर्धेत भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. मागील अपयशी मागे टाकत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचा विश्वास प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी व्यक्त केला आहे. सरदार सिंग, कर्णधार मनप्रीत सिंग, रमनदीप सिंग, एस.व्ही.सुनील, आकाशदीप सिंग यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी असेल, असेही ओल्टमन्स यावेळी म्हणाले. विश्व हॉकी लीग स्पर्धेआधी भारतीय संघाचे सराव शिबिर 19 ते 28 मे दरम्यान बेंगळूर येथे सराव शिबिर होणार आहे. यानंतर भारतीय संघ जर्मनीला रवाना होणार आहे. भारतीय संघ जर्मनीत तिरंगी मालिका खेळणार आहे. या तिरंगी मालिकेत विश्वचॅम्पियन जर्मनी व बेल्जियम संघाचा समावेश आहे.