विश्‍वकल्याण शाळेत विद्यार्थ्यांचे ई वेस्ट संकलन

0
इसिए संस्थेने राबविले जनजागृती अभियान
चिखली : अभियान एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) तर्फे विश्‍वकल्याण इंग्लिश मेडियम शाळेत ई-वेस्ट संकलन मोहिम राबविण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या या जनजागृती अभियानास त्यास शाळा प्रशासन व विद्यार्थी यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धन समिती (इसिए) तर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये ई-वेस्ट संकलन अभियान नियमित राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत चिखलीच्या विश्‍वकल्याण इंग्लिश मेडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या ई-वेस्ट व सुके प्लास्टिक शाळेत आणून पर्यावरण संवर्धन समितीकडे सुपुर्त केले. या कचर्‍याची वर्गवारी करून ‘केकेकेपीके’ या कचरा वेचक संस्थेकडे देण्यात आला.
सर्व प्रभाग कार्यालयात ई-वेस्ट जमा करणार
ई-वेस्ट व सुके प्लास्टिक यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम व त्यावर करावयाच्या उपाय योजना विषयी कुमठेकर सर व चितोडकर सर यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत बहुमोल असे मार्गदर्शन केले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) तर्फे सर्व प्रभाग कार्यालात ई-वेस्ट व प्लास्टिक जमा करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) त्यासाठी पुढाकार घेत आहे. यावेळी टाटा मोटर्सचे पर्यावरण विभाग अधिकारी बी.बी.पाटील, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, गोविंद चितोडकर, मीनाक्षी मेरुकर, राहुल श्रीवास्तव यांच्यासह चिखलीच्या विश्‍वकल्याण इंग्लिश मेडियम शाळेचे मुख्याध्यापक गायत्री धामणेकर, पर्यवेक्षिका दिपाली करंदीकर तसेच शालेय पर्यावरण समितीचे शिक्षक सोमेश्‍वर त्रिंबके सर व विद्यार्थी उपस्थित होते.