लंडन। सलगच्या विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय महिला संघाचा शनीवारी दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. या सामन्यात सलग पाचवा विजय मिळवून महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत राहिलेल्या भारतीय संघाने स्पर्धेत इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंकेला हरवत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे.
आफ्रिका पाचव्या क्रमांकावर
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने दोन विजय आणि एका पराभवासह पाचवे स्थान मिळवले आहे. मे महिन्यात झालेल्या चौरंगी लढतींंच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने आफ्रिकेला हरवलेले असल्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे.
मागील दोन सामन्यांमध्ये स्मृती मंधाना अपयशी ठरली असली तरी तिचे अपयश कर्णधार मिताली राज आणि दिप्ती शर्माच्या दमदार फलंदाजीमुळे झाकले गेले आहे. गोलंदाजीत एकता बिश्ट, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या फिरकी गोलंदाजांच्या त्रिकूटाकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. दुसरीकडे इंग्लंडकडून पराभूत झालेला आफ्रिकेचा संघ या सामन्यात बाऊन्सबॅक करेल असा विश्वास संघाची कर्णधार डेन वॅन निर्केक हिने व्यक्त केला.