नवी दिल्ली । भारताच्या विश्वनाथन आनंदने रॅपिड बुद्धिबळाच्या जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरून, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रियाधमध्ये रंगलेल्या स्पर्धेत विश्वनाथन आनंदने या विजेतपदाला गवसणी घातली. आनंदने याआधी 2003 साली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जागतिक विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी आनंद पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरला आहे. या स्पर्धेत त्याने अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला.
माजी विश्वविजेत्या आनंदने रशियाच्या दोन खेळांडूंसह पंधरापैकी साडेदहा गुणांची समसमान कमाई केली होती. त्याने टायब्रेकमध्ये रशियाच्या व्लादिमिर फेदोसिव्हवर 2-0 अशी मात करून जागतिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले .या विजयाने आनंदने जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसकडून 2013 मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमधील पराभवाचा बदला घेतला. कार्लसनने 2013 मधील अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता.