विश्‍वशांतीसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

0

शहरात बकरी ईद हर्षोल्लासात साजरी

पिंपरी-चिंचवड : शहरातील मुस्लीम बांधवांनी शनिवारी बकरी ईदचा सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला. बकरी ईदनिमित्त शहरातील पिंपरी, नेहरूनगर येथील ईदगाह मैदान, चिंचवड ईदगाह मैदान याठिकाणी सकाळी सामूहिक नजाम पठण करण्यात आले. आपल्या भारत देशाचा विकास, भरभराट व्हावी, देशात शांतता व एकोपा कायम रहावा, देशवासीयांवर कृपा राहून देशावरील सर्व संकटे दूर व्हावीत, संपूर्ण विश्‍वास शांतता नांदो, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. बकरी ईद सणानिमित्त शहरात अपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

एकमेकांना ईदच्या शुभेच्छा
शहरातील ईदगाह मैदानांवर बकरी ईदची सामूहिक नमाज अदा करण्यासाठी हजारो समाजबांधव उपस्थित होते. नमाज पठणानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मुस्लीम धर्मगुरुंनी नमाज दरम्यान देशवासीयांवर कृपा राहून सर्व संकट दूर व्हावीत, अशी प्रार्थना केली. तसेच विश्व शांतीसाठीही त्यांनी प्रार्थना केली. शनिवारी सकाळपासूनच बकरी ईदच्या सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

अशा प्रकारे साजरी होते बकरी ईद
बकरी ईदच्या आदल्या दिवशी सायंकाळी सातला मुस्लीम बांधव नमाज पठण करतात. या पठणापासूनच बकरी ईदला प्रारंभ होतो. प्रत्यक्ष ईदच्या दिवशी पहाटे नमाज पठण होते. सकाळी सातला सामूहिक नमाज पठण केल्यानंतर मुस्लीम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा प्रदान करतात. त्यानंतर कुर्बानी दिली जाते. कुर्बानी दिल्यावर त्याचे तीन भाग करून एक भाग नातेवाईक, आप्तेष्ट किंवा मित्रमंडळीला दिला जातो. दुसरा भाग स्वत:च्या घरात तर तिसरा भाग समाजबांधवांमध्ये वाटप केला जातो, अशा पद्धतीने बकरी ईद साजरी होते. या सणाला ’ईद-उल-अजहा’ असेही म्हणतात. याच महिन्यात मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी प्रस्थान करतात.