विश्‍वशांतीसाठी 48 दुचाकी रायडरांची काश्मिर ते कन्याकुमारीदरम्यान रॅली

0

भुसावळातील कय्युमखानचा समावेश : स्वच्छतेसह एकात्मता व शांतीचा संदेश देणार

भुसावळ- देशातील इतिहासात पहिल्यांदाच 48 मोटारसायकल रायडर्स काश्मीर ते कन्याकुमारी या तब्बल आठ हजार किलोमीटर अंतराची रायडींग 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी लेह येथून 13 सप्टेंबर सफरीला सुरवात करणार आहेत. या ऐतिहासिक सफरीसाठी जळगांव जिल्ह्यातील चार जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात भुसावळातील कय्युम खान (32)चाही समावेश आहे. हा युवक भुसावळ येथील गांधी पुतळ्यापासून 7 सप्टेंबरला सुरुवात करून 13 रोजी लेह येथे मोहीमेसाठी पोहोचणार आहे तसेच कन्याकुमारी येथूनदेखील मोटारसायकलने भुसावळला पोहोचणार आहे. या मोहिमेतुन महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, दिल्ली, आसाम या राज्यातील एकुण 48 मोटारसायकल चालक स्वच्छता एकात्मता व शांती असे छापील संदेश देत जनजागृती करणार आहे .

रॅलीत या रायडरांचा सहभाग
या मोहिमेत जळगांव येथून प्रवीण पाटील, हिमांशू शिरसाळे व हर्षल तावडे यांचा समावेश असणार आहे. मालेगाव, सटाणा, कळवणमार्गे सापुतारा येथे गुजरात रायडर्स मॅनिया संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिल्यावर बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, लुधियाना, जम्मू, सोनमार्ग, कारगीलमार्गे ते लेहला पोहोचतील. सापुतारा येथे मुंबईचे एक रायडर सहभागी होणार आहेत. कारगील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर लेहला रायडर्स मार्गक्रमण करणार आहेत. कन्याकुमारीहुन कय्युम खान हा युवक एकटाच मोटरसायकलने भुसावळला बंग्लोर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबादमार्गे परतणार आहे. संपूर्ण प्रवासात रस्ते सुरक्षा, शांती व एकात्मता स्वच्छता हाच संदेश दिला जाणार आहे. आजपर्यंत देशात एवढ्या मोठ्या संख्येने मोटारसायकल मोहिमचे आयोजन करण्यात आले नाही. या सफरीची लिम्का बुक ऑफ इंडिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद करणार आहे.

वडीलांनी दिले पाठबळ -कय्यूम खान
वयाच्या पाचव्या वर्षापासून सायकलिंगचा छंद आहे. वडील निजाम खान हे स्वतः सायकल रेसर असल्याने त्यांनी पाठबळ दिले असुन या मोहिमेला हाय ग्लायडर, राईड ऑन गेअर्स,हायवे डिलाइटस व वॅमोसीवीएस या संस्था सहाय्य करीत असल्याचे कय्यूम खान याने सांगितले.