मुंबई झोपडपट्टी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील निवृत्त होता होता वादात सापडले आहेत. निवृत्त होताना तब्बल 450 फाइल्स मंजूर करून त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विश्वास पाटील यांनी लेखनाच्या आणि जातीच्या जोरावर आपल्या कारकिर्दीत सर्व क्रीम पोस्ट मिळवल्या. देवेंद्र फडणवीस येताच विश्वास पाटील अडगळीत गेले होते. यापूर्वी काँग्रेसच्या काळात रायगड कलेक्टर, मुंबई कलेक्टर आदी क्रीम पोस्टिंगच उपभोगल्या. आता ब्राम्हण आले आपल्याला काही चांगली पोस्टिंग मिळणार नाही, अशी चर्चा विश्वास पाटील खासगीत करायचे. पण एका ब्राम्हणानेच त्यांना तारले आणि झोपडपट्टी प्राधिकरणात लगेच पोस्टिंग मिळाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी राज्यभर वादळ उठले. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आदी संघटनांनी विरोध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाबरले होते, त्यावेळी एका मध्यस्थाच्या मदतीने विश्वास पाटील मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले.
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे, कसे योग्य आहे, असे समर्थन विश्वास पाटील यांनी केले. एखाद्या आयएएस अधिकार्याने मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी पत्रकार परिषद घेण्याची ही महाराष्ट्राच्या इ तिहासातील पहिली वेळ असावी. यावेळी कुणीही लेखक-अधिकारी विश्वास पाटील यांच्या मदतीला धावले नाहीत. पण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी यशस्वीरीत्या केली. त्याची बक्षिसी म्हणून मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पोस्टिंग दिली. आता 450 फाइल्स प्रकरणावरून प्रकाशात आलेले विश्वास पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना बोरिवली पश्चिम येथील कोरा केंद्र जमीन घोटाळ्यात हायकोर्टाने विश्वास पाटील यांच्यावर ताशेरे ओढले होते. या प्रकरणात विश्वास पाटील चांगलेच अडकणार होते. परंतु, पुढे त्यांची बदली झाल्यानंतर हे प्रकरण थंडावले. आता हे प्रकरण मुख्यमंत्री आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर किती गंभीर घेतात, यावर पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे. पाटील यांच्या मते 120 च फाइल्स मी मंजूर केल्या. पण 120 फाइल्स एका दिवसात मंजूर केल्या, हासुद्धा रेकॉर्ड ब्रेकच झाला. या मंजूर केलेल्या फाइल्सना स्टेसुद्धा आला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस बदली घोटाळ्याचे काय? वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचा बदली घोटाळा मध्यंतरी उघडकीस आला होता. सोलापूरमधील एका वरिष्ठ अधिकार्याने याला वाचा फोडली होती. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे खासगी सचिव विद्यासागर हिरमुखे यांना अटकही झाली होती. परंतु, हे प्रकरण नंतर का थंडावले? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या बदली प्रकरणाचे धागेदोरे महासंचालक सतीश माथूर यांच्यापर्यंत पोहोचल्याने नंतर हे प्रकरण थंडावले आहे. आयपीएस आणि वरिष्ठ मपोसे अधिकार्यांच्या बदल्यांच्या मोसमात महासंचालक माथूर यांचे एजंट राजरोस राज्यभर फिरत होते, अशी तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री कार्यालयाने सुचवलेल्या बदल्याही केल्या नाहीत. उलट या सुचवलेल्या बदल्यांमधील अधिकार्यांना महासंचालकांचे दलाल संपर्क साधत होते. संपर्क झालेले अधिकारी महासंचालकांना भेटले, त्यांचेच काम झाले, बाकी अधिकार्यांना महासंचालकांनी लटकावत ठेवले. या अधिकार्यांनीही मुख्यमंत्र्यांना संपर्क साधत महासंचालकांच्या कारवायांविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर बदल्यांचे रॅकेट मुंबई क्राइम ब्रांचने त्या अधिकार्याच्या तक्रारीवरून उघडकीस आणले होते.
– नितीन सांवत, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
9892514124