पिंपरी-चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने पिंपरी बुद्रुक या गावामध्ये विविध सामाजिक कामाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पिंपरी बु. गावात वृक्षारोपण व जलसंधारणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली.
यांची उपस्थिती
यावेळी विवेक भुजबळ, प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, संदीप भोसले, विष्णु चपके, लाला माने व भास्कर रिकामे हे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्व श्रीराम सेना यांच्या वतीने व सावकार मंडळ (निगडी) यांच्या सहकार्याने भविष्यात पिंपरी बु. गाव हरित आणि जल संपदायुक्त असणारे गाव म्हणून निर्माण करण्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली. गावचे सरपंच गणेश वाळूंज, ग्राम पंचायत सदस्य नवनाथ हुंडारे, तसेच ग्रामस्थ भगवान रिठे व विजय हुंडारे, सुमंत विद्यालयचे अध्यक्ष बाबाजी ठाकूर या सर्वांनी या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.
गावाचा विकास साधणार
दरम्यान, पिंपरी प्रीमियर लिग क्रिकेट सामने भरवण्यात आले होते. या धर्तीवर क्रिकेट निमित्ताने गावच्या तरुणांना एक दिशा देण्याचे काम विश्व श्रीराम सेनेच्या सेंटर फॉर गुड गव्हर्नसकडून केले. तरुणांना आव्हान करून त्याच्याकडून पाणी संवर्धन करण्याची तयारी तरुणांनी दर्शवली. रेन वॉटर हार्वेस्टिंग (वर्षा जलसंचयन) या विषयावर एनव्हायरन्मेंट रीसॉर्स कॉर्पोरेशनच्या संचालक प्रदीप मिश्रा यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. प्रदूषण मुक्तग्राम, स्वच्छ, सुंदर हरित, जलयुक्त गाव लोकसहभागातून करण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.