विषय घ्यायचाय भाऊ, दादांना विचारावे लागेल

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी पदाधिका-यांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. भाऊ, दादांना विचारल्याशिवाय पालिकेत ’पानही’ हालत नसल्याची अनुभुती शिवसेना नगरसेवकांनी शुक्रवारी घेतली. भाजप नगरसेवकांचा रजेचा ऐनवेळचा विषय घेतला जातो. मात्र, शिवसेनेचा ’स्थळ’ बदलण्याचा साधा विषय देखील दाखल करुन घेतला नाही. प्रत्येक विषयाला विधी समिती सभापती फोनवर बोलत सभेतून बाहेर जातात. त्यानंतरच विषय मंजूर केला जातो. एखादा विषय दाखल करुन घ्यायचा असेल तर भाऊ, दादांना विचारावे लागेल असे, विधी सभापती सांगतात, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती सदस्या मीनल यादव यांनी केला.
विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवारी पार पडली. समितीच्या सभापती शारदा सोनवणे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेत भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांचा महासभेला गैरहजर राहण्याच्या विषयासह पाच ऐनवेळचे विषय मंजूर केले. मात्र, विषय पत्रिकेवरील दोन्ही विषय तहकूब ठेवले.

वाकड येथील स्थळाचा विषय
दरम्यान, शिवसेनेचा नगरसेविका मीनल यादव यांनी वाकड येथील स्थळ बदलण्याचा विषय दाखल करण्याची विनंती केली. मात्र, ऐनवेळचा असल्याने दाखल करुन घेता येणार नसल्याचे, सभापती सोनवणे यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मीनल यादव म्हणाल्या, वाकड येथील ’स्थळ’ बदलण्याचा विषय होता. त्याला आयुक्तांची मंजुरी आहे. विधी समितीत हा विषय दाखल करुन घ्यावा, अशी विनंती सभापतींना केली होती.

सभापती फोनवरून बोलतात
ऐनवेळचा विषय आहे. दाखल करुन घेतला जाणार आहे. भाऊ, दादांना विचारावे लागेल, अशी दुरुत्तरे त्यांनी दिली. स्थळ बदलाचा विषय ऐनवेळचा असल्याचे सांगत नाकारला तर भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांचा रजेचा ऐनवेळचे विषय कसा घेतला?, विषय दाखल करुन घ्यायचा असेल तर भाऊ, दादांना विचारावे लागेल असे सांगितले जाते. प्रत्येक विषयाला विधी समिती सभापती फोनवर बोलत सभेतून बाहेर जातात. प्रत्येक विषय फोनवर विचारुन दाखल करायचे म्हटल्यावर कसे काम होणार असा, सवालही यादव यांनी उपस्थित केला. प्रत्येक विषयाला त्या बाहेर जाऊन बोलणार असतील तर आम्ही सभेला ’टाईपासला’ येत आहोत काय? असेही यादव म्हणाल्या. विषय तरी दाखल करुन घ्यायला पाहिजे होता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विषय दाखल करुन घेण्यासाठी भाऊ, दादांना फोन करा असे मी काहीच म्हटले नाही. विधी समितीत ऐनवेळचे विषय दोन दिवस अगोदर घेतले जातात. त्यानंतर अधिका-यांना बोलवून विषय समजून घेते.
-शारदा सोनवणे, सभापती, विधी समिती

राहूल कलाटे यांची एकनाथ पवारांशी हुज्जत
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे प्रभाग क्रमांक 25, वाकडचे प्रतिनिधीत्व करतात. कलाटे यांना या प्रभागातील विविध विकासकामांसाठी तरतूद केलेली तब्बल सहा कोटी रुपयांचे वर्गीकरण करायचे आहे. त्यासाठी त्यांनी विधी समितीसमोर ऐनवेळचा प्रस्ताव सादर केला. समितीतील शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांच्यामार्फत हा ऐनवेळचा प्रस्ताव आणण्यात आला. मात्र समिती सभापती शारदा सोनवणे यांनी तरतूद वर्गीकरणाच्या या ऐनवेळच्या प्रस्तावाबाबत महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. मात्र नगरसेविका यादव यांनी तरतूद वर्गीकरणाचा प्रस्ताव सभेपुढे फक्त दाखल करून घेण्याची वारंवार विनंती केली.

त्यानुसार सभापती सोनवणे यांनी तरतूद वर्गीकरणाचा प्रस्ताव सभेपुढे दाखल करून घेतला. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते कलाटे यांनी हा प्रस्ताव सभेत मंजूर करावा यासाठी सभापती सोनवणे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा पक्षपातळीवरचा निर्णय असल्यामुळे महापौर काळजे, पक्षनेते पवार यांच्याशी चर्चा करून पुढील सभेत प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या भूमिकेवर सभापती सोनवणे ठाम राहिल्या. त्यामुळे संतापलेले शिवसेना गटनेते कलाटे यांनी तडक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे कार्यालय गाठले. माझ्या प्रभागातील विषय का टाळता, असे म्हणत कलाटे यांनी पवार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली, असेही सांगण्यात आले.