विषय न कळणार्‍यांच्या वक्तव्याला महत्व नाहीच ! फडणवीसांच्या ट्विटबाबत शरद पवार स्पष्टच म्हणाले

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केलेल्या ट्टिटला जळगावात राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी शुक्रवारी उत्तर दिले. ते म्हणाले की, ज्यांना विषय कळत नाही, अशांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. गुरुवारी फडणवीस यांनी 1993 मधील मुंबईतील बॉम्बस्फोटाबाबत पवार यांनी 12 नव्हे तर 13 बॉम्बस्फोट झालेत व हा 13 वा स्फोट मुस्लीम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितले, असे ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावरून पवारांनी जळगावात फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले.

पवार म्हणाले तर अजून लागली असती आग
धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार स्व. मुरलीधर पवार यांचा पुतळा अनावरण सोहळा व जळगाव येथे महिला परीषद मेळाव्यासाठी शरद शुक्रवारी शरद पवार जळगाव जिल्हा दौर्‍यावर होते. जैन हिल्सला पत्रकार परीषदेत पवार म्हणाले की, या साखळी स्फोटांची तपास यंत्रणांकडून माहिती घेताना 12 हिंदू परीसरात व एक मुस्लीम वस्तीत (मोहम्मद अली रोड परीसरात) स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. ते आपण सांगितले होते. स्फोटात परकीय शक्तीचा हात होता. त्यामागे देशात जातीय दंगली घडवण्याचा उद्देश होता. श्रीकृष्ण आयोगासमोरही हेच सांगितले. त्यामुळे जातीय दंगली झाल्या नाही. त्यावेळी मी तशी भूमिका घेतली नसती तर अजून आग लागली असती. तो समाज हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय होता आणि ज्यांना याचे गांभीर्य कळत नाही, त्यांनी अशी विधाने केली तरी त्याची फारशी नोंद घेण्याचे काही कारण नसल्याचा टोलाही पवारांनी यावेळी फडणवीस यांना लगावला.

ईडीचा सर्रास होतोय गैरवापर
भाजपाला कसेही करून महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या दोन राज्यांत सत्तेत यायचे आहे. प्रत्यक्ष प्रशासनात हस्तक्षेप करता येत नाही म्हणून ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा शरद पवार म्हणाले.