या महिनाअखेर विद्यमान सभापतिंची मुदत संपणार
इच्छुकांकडून नेत्यांचे उबरठे झिजविणे सुरु
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्थायी समिती, महापौर आणि उपमहापौर, पक्षनेते आदी पदांवर संधी न मिळालेल्यांसाठी विषय समिती सभापती हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्यावर संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांनी चिंचवड, पिंपरी, भोसरीतील भाजपच्या नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. दादा-भाऊ यांच्या गटासह निष्ठावतांच्या गटाला या पदवाटपात किती झुकते माप मिळते याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून आहेत.
भाजप नगरसेवकांची मोर्चेबांधणी
महापालिकेच्या विषय समित्यांवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, सर्व समित्यांवर भाजपचे वर्चस्व असल्याने सभापती सत्तारूढ पक्षाचेच होणार आहेत. स्थायी समिती सभापती या पदाच्या खालोखाल विधी समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती, जैवविविधता समिती अशा पाच प्रमुख समित्या आहेत. या समित्यांच्या सभापतिपदासाठी सद्या जोरदार चुरस पहावयास मिळत आहे. विधी समिती सभापतिपदी शारदा सोनवणे, कला-क्रीडा-समिती अध्यक्षपदी लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी सुनीता तापकीर, शहर सुधारणा समिती सभापतिपदी सागर गवळी, जैवविविधता समिती अध्यक्षपदी उषा मुंढे या आहेत. या पाचही समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरला संपणार आहे.
कोणत्या गटाला मिळणार झुकते माप?
विधी समितीत नऊ, जैवविविधता समितीत सात, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा समितीवर प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य प्रत्येक समितीत जाणार आहे. त्यामुळे काही पक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. सभापतिपदी वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांनी नेत्यांचे उंबरे झिजविणे सुरु केले असून, या समित्यांवर आमदार महेश लांडगे किंवा आमदार लक्ष्मण जगताप या गटांपैकी कोणाची वर्णी लागते, याविषयी महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.