विषय समीती सभापती पदी तीन राष्ट्रवादी तर दोन काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी

0

इंदापूर नगरपरीषदेची विशेष सभा : निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील यांची माहिती

इंदापूर । इंदापूर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडी शुक्रवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत तीन राष्ट्रवादी तर दोन काँग्रेसच्या नगरसेवकांची सभापतीपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती इंदापूर तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील यांनी दिली. महिला विकास व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उषा श्रीकांत स्वामी तर आरोग्य, स्वच्छता, शेती व उद्यान समिती सभापतीपदी राजश्री अशोक मखरे, वीज व वृक्षसंवर्धन समितीपदी स्वप्नील राऊत, बांधकाम नियोजन व विकास समिती सभापतीपदी धनंजय पाटील, पाणी पुरवठा व अर्थसमिती पदी मनिषा पांडूरंग शिंदे यांची निवड करण्यात आली.नगराध्यक्षा अंकिता शहा सभेच्या अध्यक्षसपदी होत्या. नगरसेवक श्रीधर बाब्रस, कैलास कदम, पोपट शिंदे, गजानन गवळी, जगदीश मोहिते, मीना ताहेर, हेमलता माळूंजकर, मधुरा ढवळे, सुवर्णा मखरे, अनिता धोत्रे, अमर गाडे, अनिकेत वाघ आदी नगरसेवकासह मुख्याधिकारी रामनिवास झंवर याप्रसंगी उपस्थित होते.

संगनमताने सभापतीपदाचे वाटप
नगरपरीषदेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे नऊ-नऊ नगरसेवक आहेत तर नगराध्यक्षपद काँग्रेसकडेच असल्याने काँग्रेसची सत्ता आहे. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाणीपुरवठा व अर्थ समिती होती. ती आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. तर वीज व वृक्ष संवर्धन समिती काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. शहर विकासाचा मुद्दा पुढे करून दोन्ही काँग्रेसने समजूतदारपणाने विषय समित्या सभापतीपद घेतले असले तरी शहरात अनेक दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेच्या कामगार प्रश्‍नी झालेली आंदोलने, चर्चा यामुळे आरोग्य समिती चर्चेत राहिली होती. येथून पुढे ही चर्चेत राहावी, अशीच व्यवस्था दोन्ही काँग्रेसने केली असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.
(फोटो मखरे आणि राऊत नावाने आहे.